भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत रोहित पुनरागमन करणार होता. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रोहितचं मैदानातलं पुनरागमन आता लांबणीवर पडलं आहे. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात अखेरचा टी-२० सामना खेळताना रोहितला दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं.

माजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ब्रॅड हॉजने रोहित शर्मावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. सोशल मीडियावर ब्रॅड हॉजला, टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक कोणता फलंदाज झळकावू शकेल?? असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता…यावर उत्तर देताना हॉजने रोहित शर्माचं नाव घेतलं आहे.

२०१९ वर्ष रोहित शर्मासाठी चांगलं गेलं. वन-डे, टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला कसोटी संघातही सलामीला येण्याची संधी मिळाली. रोहितने या संधीचं सोनं करत कसोटी संघात सलामीच्या जागेवर आपला दावा सांगितला. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार होता. मात्र करोनामुळे ही मालिका रद्द करण्यात आली आहे.