भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्मा गेल्या काही वर्षांपासून चांगल्याच फॉर्मात आहे. वन-डे आणि टी-२० संघाचं उप-कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहितचं अनेकदा त्याच्या नेतृत्वगुणांसाठी कौतुक होतं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सर्वाधिक विजेतेपदं मिळवून देत रोहित शर्माने आपण चांगला कर्णधार असल्याचंही दाखवून दिलं आहे. रोहितच्या या गुणाचं मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने कौतुक केलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने ४ वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे.

“रोहित एक चांगला कर्णधार आहे यात काही शंकाच नाही. अनेकदा त्याला मैदानात जसं सुचतं जे योग्य वाटतं ते निर्णय तो घेतो. असं असलं तरीही तो आपल्या प्रतिस्पर्ध्याची मिळेल तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते हीच त्याची सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे.” जयवर्धने Sony Ten वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.

अनेकदा तो कर्णधार या नात्याने आम्हाला प्रश्न विचारत असतो. संघ निवडीदरम्यान कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळायला हवी, त्यापाठीमागची कारणं काय आहेत याचाही तो अभ्यास करतो, जयवर्धने रोहितच्या फलंदाजीचं कौतुक करत होता. २०२० साली जानेवारी महिन्यात रोहित न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामना खेळताना जखमी झाला होता. यामुळे त्याला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं होतं. यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आयपीएलमधून रोहित पुनरागमन करणार होता पण करोनामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.