श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या भारताच्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. आयसीसीची एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत दोन स्थानांनी बढती घेत रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

या क्रमवारीत रोहितने पहिल्यांदाच ८०० गुणांचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका २-१ अशी भारताने जिंकली असून रोहितच्या खात्यात ८१६ गुण आहेत. यापूर्वी रोहितने फेब्रुवारी २०१६ मध्ये ८२५ गुणांची कमाई केली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरलेला शिखर धवन क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत चौदाव्या स्थानावर पोहोचला आहे. धवनने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात ६८ धावा करताना रोहितबरोबर ११५ धावांची सलामी दिली होती. या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ८७६ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ए बी डी’व्हिलियर्स ८७२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने २८व्या स्थानावरून २३व्या स्थान गाठले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने १६ स्थानांची कमाई करत कारकीर्दीतील सर्वोत्तम ५६वे स्थान पटकावले आहे.