तिसऱ्या टी-२० सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मानं मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये सेडन पार्कवर सुरू असलेल्या टी-२० सामन्यात ५० धावा करताच रोहित शर्माच्या नावावर हा विक्रम झाला आहे.

स्फोटक सलामी फलंदाज रोहित शर्मानं २१९ व्या डावांत हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकरने २१४ डावांत दहा हजार धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना वेगवान दहा हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे.


२३ चेंडूत झळकावलं अर्धशतक –
रोहित शर्मानं तिसऱ्या टी २० क्रिकेटमध्ये वादळी खेळी करताना अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. रोहितने तीन षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्या रोहित शर्माने ६५ धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले.

सलामी फलंदाज रोहित शर्माचे अर्धशतक (६५) आणि कर्णधार विराट कोहली (३८) यांच्या खेळीच्या बळावर भारताने निर्धारित २० षटकांत पाच बाद १७९ धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडला विजयासाठी १८० धावांचे आव्हान देण्यात आलं आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने बाजी मारत पाच सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने भारतीय संघ खेळत आहे.