आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वन-डे आणि टी-२० संघात स्थान मिळालं नाही. परंतू कसोटी संघात रोहित शर्माने आपलं स्थान कायम राखलं आहे. सध्या रोहित शर्मा NCA मध्ये आपल्या फिटनेसवर काम करतोय. विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर माघारी परतणार आहे, अशा परिस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करावं असं मतही अनेकांनी व्यक्त केलं. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला संघात सलामीवीराची भूमिका मिळणार की मधल्या फळीतली?? हा प्रश्न गेले काही दिवस सोशल मीडियावर विचारला जात आहे. परंतू रोहितने मात्र कोणत्याही जागेवर फलंदाजीसाठी येण्याची तयारी दाखवली आहे.

“मी तुम्हालाही तिच गोष्ट सांगेन जी इतरांना सांगत आलोय. संघाला माझी ज्या जागेवर गरज असेल तिकडे फलंदाजीसाठी येण्यास मी तयार आहे. माझी सलामीवीराची भूमिका बदलली जाणार आहे का हे मला माहिती नाही. मी कुठे फलंदाजी करावी हा निर्णय टीम मॅनेजमेंट घेईल. विराटच्या अनुपस्थितीत सलामीला कोण येईल आणि इतर फलंदाज कुठे फलंदाजी करतील यावर आतापर्यंत ऑस्ट्रेलियात निर्णय झाला देखील असेल. मी जेव्हा तिकडे पोहचेन त्यावेळी मला कल्पना येईल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रोहितने आपली बाजू मांडली.

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ या दौऱ्यात ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – …तर रोहित-इशांतला ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी निघावं लागेल – रवी शास्त्री