सध्या देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू या काळात आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत क्रिकेटचा माहोल कायम राखण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतला फलंदाज हनुमा विहारीनेही सध्याच्या काळात ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

यावेळी एका चाहत्याने हनुमा विहारीला वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सलामीवीर डेव्हिड वॉर्नर की रोहित शर्मा असा प्रश्न विचारला. यावर हनुमा विहारीने लगेच रोहित शर्माचं नाव घेतलं.

रोहित आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघासाठी वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला येतात. दरम्यान, अनेक खेळाडू सध्याच्या खडतर काळात मदतकार्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया, इरफान आणि युसूफ पठाण यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.