विंडीजविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आक्रमक शतकी खेळीची नोंद केली. रोहितने विंडीजच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत 137 चेंडूमध्ये 162 धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीत 20 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. दरम्यान आजच्या खेळीत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला आणखी एक विक्रम मोडला आहे.

भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. रोहितने आजच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. रोहितने 186 डावांमध्ये 196 षटकार ठोकले आहेत. या यादीमध्ये महेंद्रसिंह धोनी 218 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

दरम्यान रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 377 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा सामना जिंकण्यासाठी विंडीजला 378 धावांचं आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे विंडीजचे फलंदाज हे आव्हान कसं पार करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.