करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धांवर याचा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात झाली असली तरी भारतीय संघातील खेळाडू अजूनही घरातच आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IPLमध्ये खेळण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. पण २० ऑगस्टपर्यंत खेळाडूंना घरातच बसून राहायचे आहे, त्यामुळे खेळाडू आपापल्या घरी विश्राम घेत आहेत. अशा काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी खेळाडू लाईव्ह चॅट किंवा इतर गोष्टींचा आधार घेत आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेदेखील नुकतेच ट्विटरवर प्रश्नोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

ट्विटरच्या माध्यमातून रोहितला चाहत्यांनी विविध प्रकारचे प्रश्न विचारले. काही त्याच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी होते तर काही क्रिकेटबद्दल होते. याच प्रश्नांमध्ये त्याला विचारण्यात आलं की जर तुला मुंबई इंडियन्सच्या निवृत्त खेळाडूंपैकी एका खेळाडूला संघात पुन्हा घ्यायची संधी मिळाली तर तू कोणाची निवड करशील? या प्रश्नावर रोहितने अगदी झकास उत्तर दिलं. रोहित म्हणाला, “जर मला अशी संधी देण्यात आली तर मी एकाऐवजी दोन खेळाडूंना संघात परत घेईन. ते दोन खेळाडू म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॅक.” रोहितने या व्यतिरिक्तदेखील अनेक प्रश्नांची खुमासदार उत्तरं दिली.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे रात्री साडे सात वाजता सुरु होणार आहेत. तर, एकाच दिवशी दोन सामने असल्यास पहिला सामना साडे तीनला सुरू होतील.