विशाखापट्टणम कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी मात केली. या विजयासह भारत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. मयांक अग्रवालनेही पहिल्या डावात द्विशतक झळकावत रोहितला उत्तम साथ दिली होती. या खेळीचा रोहित आणि मयांकला कसोटी क्रमवारीत फायदा झालेला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत रोहितने १७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. कसोटी कारकिर्दीतलं रोहितचं हे सर्वोत्तम स्थान मानलं जात आहे. याचसोबत मयांक अग्रवालनेही आपल्या क्रमवारीत ३८ स्थान झेप घेत थेट २५ वं स्थान पटकावलं आहे. याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं दुसरं तर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. रोहितने विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या होत्या.

अवश्य वाचा – आश्विनमध्ये कसोटीत ५०० बळी घेण्याची क्षमता – हरभजन सिंह

गोलंदाजांमध्ये फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने सर्वोत्तम १० गोलंदाजांमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आश्विनने ८ बळी घेतले. आश्विन १४ व्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर आला आहे. तर दुसऱ्या डावात ५ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीच्या स्थानातही सुधारणा झाली असून तो १८ वरुन १६ व्या स्थानी आला आहे. गुरुवारी या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला पुण्यातील गहुंजे येथील मैदानावर सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – मोहम्मद शमी रिव्हर्स स्विंगचा बादशहा ठरु शकतो !