करोना विषाणूचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसलेला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या असून आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. भारतीय खेळाडू या काळात घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही खेळाडू क्रिकेटचा मोहाल कायम रहावा यासाठी आपले सहकारी व इतर देशातील मित्रांशी सोशल मीडियावर संवाद साधत आहेत.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसोबत काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर लाईव्ह गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये रोहितने आपल्या निवृत्तीविषयी भाष्य केलं. “सध्या मी ३३ वर्षांचा आहे, ३८-३९ व्या वर्षी मी निवृत्ती स्विकारेन. भारतात मोठं होत असताना क्रिकेट हे आमचं आयुष्य बनून जातं. मात्र क्रिकेट व्यतिरीक्तही पुढे काही आयुष्य आहे, निवृत्तीनंतरचा वेळ मी माझ्या परिवाराला देणार आहे.” वॉर्नरसोबत गप्पा मारताना रोहितने आपल्या निवृत्तीविषयी भाष्य केलं.

२००७ साली रोहितने भारतीय संघात पदार्पण केलं. यानंतर सुमारे ४ वर्ष रोहित संघात ये-जा करुन होता. मात्र २०११ विश्वचषक संघात रोहितला स्थान नाकारण्यात आल्यानंतर त्याने आपल्या खेळात मोठा बदल केला. यानंतरच्या काळात रोहितने धडाकेबाज कामगिरी करत टीम इंडियातलं आपलं स्थान पक्क केलं. इतकच नव्हे तर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचं नेतृत्वही करतो. वन-डे, टी-२० सोबत कसोटी क्रिकेटमध्येही रोहितने चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.