भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. पहिली ५-१० षटकं मैदानात रोहित शर्मा टिकला तर त्यानंतर त्याला बाद करणं हे कठीण असतं असं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. मात्र आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये रोहित शर्माला डेल स्टेन आणि ब्रेट ली या दोन गोलंदाजांचा सामना करणं अत्यंत कठीण जायचं. मोहम्मद शमीसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारताना रोहितने याबद्दल सांगितलं.

अवश्य वाचा – रोहित शर्माच्या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला – गौतम गंभीर

तुझा सध्याच्या घडीचा सर्वात आवडता गोलंदाज कोण या प्रश्नाला उत्तर देताना रोहित शर्माने कगिसो रबाडा आणि जोश हेजलवुडचं नाव घेतलं. मात्र सुरुवातीच्या काळात आपल्याला स्टेन आणि ब्रेट ली यांचा सामना करणं अत्यंत कठीण जायचं असं रोहित म्हणाला. “ज्यावेळी मी भारतीय संघात आलो, त्यावेळी ब्रेट ली हा सर्वात जलद गोलंदाज मानला जायचा. माझ्या पहिल्या वन-डे मालिकेसाठी मी आयर्लंडला गेलो होतो, त्यावेळी डेल स्टेन प्रचंड फॉर्मात होता. या दोघांचा सामना करणं खरंच कठीण आहे.” रोहितने आपल्या भावना मांडल्या.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. २०२० वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा सहभागी झाला होता, मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यातून परिस्थिती सावरल्यास भारतीय क्रिकेटपटू मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्येही रोहितकडे द्विशतक झळकवायची होती संधी, पण…