भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आपला लोणावळ्यातील बंगाला खरेदीच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत विकालाय. रोहितने तब्बल ७५ लाखांचं नुकसान सहन करत हा बंगला विकला आहे. २०१६ साली घेतलेला बंगला रोहितने मे महिन्यामध्येच विकल्याची बातमी स्वेअर फीट इंडिया डॉट कॉमने झॅपकीने दिलेल्या माहितीच्या आधारे दिलीय.

लोणावळ्यामधील डिस्कव्हरी नावाच्या प्रकल्पामध्ये रोहितची ही प्रॉपर्टी होती. एसटू रिअ‍ॅलिटीची निर्मिती असणाऱ्या या प्रकल्पामधील १५ क्रमांकाचा बंगला रोहितने २०१६ साली विकत घेतला होता. या बंगल्याचं क्षेत्रफळ ६ हजार ३२९ स्वेअर फूट इतकं आहे. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता सुनील शेट्टीने लोणावळ्यात डिस्कव्हरी नावाचा हा मोठा प्रकल्प २०१६ साली उभारला. हा प्रकल्प एकूण सात एकरांवर पसरलेला असून त्यामध्ये २१ हून अधिक बंगले आहेत. या प्रकल्पातील प्रत्येक बंगल्याला खासगी गच्ची असून एसटू रिअ‍ॅलीटीच्या मालकीचा हा प्रोजेक्ट आहे. एसटू रिअ‍ॅलीटी या कंपनीमध्ये सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी मानासोबतच इतर काही भागीदार आहेत.

२९ मे २०२१ रोजी या बंगल्याच्या व्यवहारांची कागदोपत्री पुर्तता पार पडली त्यानंतर या बंगल्याच्या विक्रीची नोंदणी १ जून २०२१ रोजी करण्यात आली. या बंगल्याच्या व्यवहारासाठी २६ लाख २५ हजारांची स्टॅम्प ड्युटी देण्यात आल्याचं कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. रोहितने २०१६ साली जानेवारी महिन्यामध्ये हा बंगला विकत घेतला होता. त्यावेळी त्याने या बंगल्यासाठी ६ कोटी रुपये किंमत मोजली होती. २०१६ साली त्याने बंगल्याच्या व्यवहारासाठी ३० लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली होती. झॅपकीच्या माहितीनुसार रोहितने ७५ लाखांचं नुकसान सहन करत या बंगल्याचा व्यवहार केलाय. त्याने नुकसान उचलून हा बंगला एवढ्या तडकाफडकी का विकला यासंदर्भातील माहिती मात्र समोर आलेली नाही.

नक्की पाहा हे फोटो >> रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का?

इंडियन प्रिमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणाऱ्या रोहितीने मुंबईतील प्रभादेवीमध्ये नुकताच एक उंच इमारतीमध्ये आलिशान फ्लॅट घेतलाय. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रोहित शर्मा बोरिवलीत राहणाऱ्या आजी-आजोबा, काका-काकूंकडे लहानाचा मोठा झालाय. रोहित सध्या आलिशान घरात राहतोय. रोहित शर्माचं वरळीमधील हे आलिशान घर वरळीतील आहूजा अपार्टमेंट्समध्ये आहे. २०१५ मध्ये रितिका सजदेह हिच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर रोहित शर्मानं ३० कोटी रुपयांना वरळीतील हे घर खरेदी केलं होतं. लग्नानंतर रोहित शर्मा या घरामध्ये राहण्यासाठी गेला. रोहित शर्माचा हा आलिशान फ्लॅट सहा हजार स्क्वेअर फूटांचा आहे.