विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत आश्वासक कामगिरी केली आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या सामन्यानंतर विराट आणि रोहित शर्मा यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांसमोर आल्या होत्या. विराटने या वृत्ताचा इन्कार केला असला तरीही याच काळात भारतीय संघाचं कर्णधारपद विभागून देण्यात यावं असा मुद्दा चर्चेला आला. सध्या लॉकडाउन काळात सर्व क्रिकेट सामने बंद आहेत. भारताचे माजी गोलंदाज अतुल वासन यांनी पुन्हा एकदा टी-२० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यावं असा पर्याय सुचवला आहे.

“भारतीय संघाचं कर्णधारपद विभागलं जावं असं माझंही मत आहे. विराटला तिन्ही प्रकारात कर्णधारपद भूषवायचं आहे, परंतू रोहितनेही तो चांगला कर्णधार आहे हे सिद्ध करुन दाखवलं आहे. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली आहे, तो संघाला एकत्र ठेवून मैदानात लढतो. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच कर्णधार हवा, वन-डे क्रिकेटमध्ये पुढील विश्वचषकापर्यंत कोहलीकडेच नेतृत्व असायला हवं. पण टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधारपदासाठी रोहित शर्माच्या नावाचा विचार होण्यास हरकत नाही. यामुळे विराटवरचा ताण कमी होईल.” अतुल वासन Sportskeeda संकेतस्थळाशी बोलत होते.

अवश्य वाचा – भारताच्या क्रिकेट संघात एकजुट नाही – मोहम्मद कैफ

भारतीय संघाव्यतिरीक्त आयपीएलमध्ये खेळत असताना रोहितची कर्णधार म्हणून कामगिरी आश्वासक राहिलेली आहे. मुंबई इंडियन्सला सर्वाधिकवेळा विजेतेपद मिळवून देण्यात रोहितचा महत्वाचा वाटा आहे. आतापर्यंत अनेकदा विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जगभरातील सर्व क्रिकेटस्पर्धा बंद आहेत. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर क्रिकेटपटू पुन्हा कधी मैदानात उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.