विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्धचा मँचेस्टरच्या मैदानातील सामना जिंकत भारताने मालिकेतील तिसरा विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक स्पर्धेतील विजयी घौडदौड भारताने सुरु ठेवली असून हा पाकिस्तानविरुद्धचा सर्व विश्वचषक स्पर्धांमधील भारताचा सातवा विजय ठरला आहे. या विजयामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतक ठोकत मोलाचा वाटा उचलला. ११३ चेंडूत १४० धावांच्या झंझावाती खेळीसाठी रोहितला समानावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याला पाकिस्तानी संघाला फलंदाजीसंदर्भात काही सल्ला द्यायला असल्यास काय द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला रोहितने एकदम मजेदार उत्तर दिले.

‘सहकारी म्हणून तुम्ही पाकिस्तानी फलंदाजांना काय सल्ला द्याल? धावांच्या दृष्काळातून त्यांनी कशाप्रकारे बाहेर यावेसाठी त्यांनी काय सांगाल’, असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने रोहितला विचारला. हा प्रश्न ऐकून रोहित हसला. ‘जर मी पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर मी नक्की सांगेन. आता तर..’ एवढं उत्तर देऊन रोहित थांबला आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. ‘आता काय सांगणार त्यांना?’, असं हसतच रोहित म्हणाला आणि पुढच्या प्रश्नाकडे वळला. रोहितच्या या उत्तराचा व्हिडिओ ‘क्रिकइन्फो’ने शेअर केला असून एक लाखाहून अधिक जणांनी अवघ्या काही तासांमध्ये तो पाहिला आहे.

दरम्यान भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने रोहितने के. एल. राहुलच्या सोबतीने सलामीला येत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी शतकी सलामी दिली. रोहितने मालिकेमधील दुसरे शकत साजरे केले. त्यानंतर धावगती वाढवण्याच्या नादात एक फटका मारताना रोहित १४० धावांवर झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीनेही चांगली फटकेबाजी करत ६५ चेंडूत ७७ धावांची खेळी करत भारताची धावसंख्या ३३६ पर्यंत पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला. इतके मोठे आव्हान पाकिस्तानला झेपले नाही आणि पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुइस पद्धतीनुसार ८९ धावांनी विजय मिळवला.