भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात आलबेल आहे का? समाजमाध्यमांवर या दोघांमधील मतभेदाचे दाखले दिले जात आहेत. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने याबाबत स्पष्टीकरण देताना ‘‘या प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या रोचक बातम्या आहेत’’ असे म्हटले होते. परंतु अमेरिका-वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत विराट रोहितशी मतभेदांबाबत काय स्पष्टीकरण देतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारतीय संघ कोणत्याही दौऱ्यावर जाण्यापूर्वी कर्णधार पत्रकार परिषद घेऊन आगामी आव्हानांविषयी संघाचे धोरण स्पष्ट करतो. सोमवारी रात्री भारतीय क्रिकेट संघ अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी दोन ट्वेन्टी-२० सामने खेळून भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. मग वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघ आणखी तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. भारताच्या कसोटी संघात निवडलेले खेळाडू काही दिवसांनी वेस्ट इंडिजला रवाना होणार आहेत.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघातील मतभेद सर्वप्रथम उघड झाले. मग उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघात गटबाजीचे राजकारण, विराट-रोहित यांच्यात मतभेद अशी वृत्ते प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. त्यामुळे विराटच्या पत्रकार परिषदेबाबत उत्सुकता होती. विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने रोहित आणि त्याच्या पत्नीला ‘इन्स्टाग्राम’वर ‘अनफॉलो’ केल्यामुळे या मतभेदांच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. भारताच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये याकरिता संघातील मतभेदांसंदर्भात खेळाडूंशी सामंजस्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असे ‘बीसीसीआय’च्या एका माजी पदाधिकाऱ्याने सांगितले.