इंग्लंडविरुद्ध निर्णायक लढत जिंकल्यानंतर कर्णधाराचे संकेत

अहमदाबाद : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीची लय बिघडवून टाकण्यासाठी धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या साथीने आक्रमक भारतीय कर्णधार विराट कोहली सलामीला उतरण्याची योजना आखत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० लढतीत रोहितसह सलामीला उतरून विराटने शनिवारी भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला. या सामन्यात विराट-रोहितने ९४ धावांची दमदार सलामी नोंदवल्यामुळे भारताला २ बाद २२४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. या यशस्वी डावपेचानंतर वर्षांच्या उत्तरार्धात भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने विराट सलामीला उतरण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे.

‘‘संघातील दोन सर्वोत्तम फलंदाज सलामीला उतरल्याने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दडपण येईल. एक फटकेबाजी करीत  असेल, तर दुसरा संयमाने त्याला साथ देऊ शकेल त्यामुळे पुढील क्रमांकांवर उतरणाऱ्या फलंदाजांचाही आत्मविश्वास दुणावेल,’’ असे ५२ चेंडूंत ८० धावा करणाऱ्या विराटने सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक एकूण २३१ धावा काढणाऱ्या विराटला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

रोहितच्या साथीने केलेल्या भागीदारीविषयी विराट म्हणाला, ‘‘रोहित आणि मी दोघेही या उद्देशाबाबत सकारात्मक होतो. त्यानुसार आम्ही आपापली भूमिका योग्य वठवली. रोहितने दर्जेदार खेळी साकारली, तर तिसऱ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादवने स्फोटक फलंदाजीची आणखी एक अदाकारी पेश केली. त्यानंतर हार्दिक पंडय़ाने हाणामारीच्या षटकांमध्ये आतषबाजी केली. संघासाठी हे रचनात्मक बदल फलदायी ठरले.’’

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अजून बराच अवधी आहे. त्यामुळे आमची फलंदाजीची रचना कशी असेल, याबाबत बोलणे अतिघाईचे ठरेल. आम्ही कामगिरीचे पृथक्करण करून संघासाठी जे सर्वात योग्य असेल, तेच अमलात आणू. अखेरच्या सामन्यात अतिरिक्त गोलंदाज खेळवण्यासाठी के. एल. राहुलला संघाबाहेर ठेवण्याचा कठीण निर्णय डावपेचाचा भाग म्हणून घ्यावा लागला.

रोहित शर्मा, भारताचा उपकर्णधार