मुंबई : शक्य झाल्यास यंदाच्या वर्षांत ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या दोन्ही क्रिकेट स्पर्धा खेळण्याची माझी इच्छा असल्याचे भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने सांगितले.

टाळेबंदीनिमित्त गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटविश्व ठप्प पडलेले आहे. मात्र विश्वचषक आणि ‘आयपीएल’च्या बाबतीत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. रविवारी रोहितने ‘इन्स्टाग्राम’वर चाहत्यांशी संवाद साधतानाच एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विश्वचषक आणि ‘आयपीएल’ दोन्हीही स्पर्धा खेळण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला.

‘‘मला दोन्ही स्पर्धामध्ये खेळावेसे वाटते. परंतु सध्याचे चित्र पाहता कोणत्या तरी एकाच स्पर्धेत या वर्षी खेळता येईल, अशी शक्यता आहे. त्यापूर्वी आपण सर्वानी मिळून करोनावर विजय मिळवणे आवश्यक आहे,’’ असे ३३ वर्षीय रोहित म्हणाला.

विश्वातील कोणत्या फलंदाजांची फलंदाजी पाहण्यास तुला आवडते, असे विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा जेसन रॉय यांची फलंदाजी पाहणे मला फार आवडते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत गुलाबी चेंडूसमोर सलामीला उतरण्याचे आव्हान पेलण्यासाठी मी उत्सुक आहे.’’

रोहित म्हणजे माझ्यासाठी सचिनच -राहुल

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे पूर्वी सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहून अनेक जण आश्चर्यचकित व्हायचे, त्याचप्रमाणे रोहितसोबत खेळताना अथवा त्याची फलंदाजी पाहून मला भारावल्यासारखे होते, अशी प्रतिक्रिया भारताचा फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केली. ‘‘रोहित नेहमीच माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. त्याच्यासह मैदानावर अथवा मैदानाबाहेर मी जितका वेळ घालवतो, तितके मला अधिक शिकायला मिळते. सध्याच्या संघात माझ्यासाठी तो सचिनप्रमाणे आहे. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूकडून मला फार प्रेरणा मिळते,’’ असे राहुल म्हणाला. त्याशिवाय २०१९ मध्ये निलंबनाची शिक्षा भोगल्यापासून माझ्या खेळात अधिक सुधारणा झाल्याचेही राहुलने मान्य केले.