दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून प्रथमच खेळणाऱ्या रोहित शर्माने आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. पहिल्या डावात दीडशतकी खेळी करणाऱ्या रोहितने दुसऱ्या डावातही आक्रमक खेळी करत शतक ठोकले. पहिल्यांदाच सलामीला येऊनही यशस्वी ठरल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण रोहितची पत्नी रितिकाने मात्र एका मुद्द्यावरून रोहितला ‘क्लीन बोल्ड’ केले.
सध्या रोहित आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमुळे फिरतीवर आहे. त्यामुळे रोहितची पत्नी रितिका हिने तिचा स्वत:चा आणि मुलगी समायरा हिचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला. त्या फोटोमध्ये तिने ‘माझी मुलगी’ असे कॅप्शन दिले आणि फोटो काढणाऱ्याचे नाव लिहिले.
तो फोटो पाहून रोहितला रितिकाची मस्करी करावीशी वाटली. त्यामुळे त्या फोटोवर कमेंट करताना त्याने या फोटोत मी काही नाही. तुम्हाला माझी आठवण झाली नाही का? असा मजेशीर सवाल केला. पण त्यावर रितिकाने एक भन्नाट उत्तर दिले. तु देखील माझी मुलगीच आहेस, असे उत्तर देत तिने रोहितला क्लीन बोल्ड करून टाकले.
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात मात्र रोहितने गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
First Published on October 9, 2019 5:55 pm