भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत चांगल्या फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्यात रोहितने शतकी खेळीची नोंद केली. गेल्या काही वर्षांमध्ये रोहितने भारताच्या वन-डे संघात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केली आहे. मात्र त्याच्या खेळात झालेल्या सुधारणेमागे एक मोठं कारण आहे. रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी पीटीआयशी बोलताना माहिती दिली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : वन-डे क्रिकेटमध्ये रोहित सर्वोत्तम सलामीवीर – मायकल क्लार्क

२०११ विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. या घटनेनंतर रोहित आपल्या करिअरकडे अधिक गांभीर्याने पहायला लागला. मी लहानपणापासून रोहितला पाहतो आहे, रोहित आता अधिक समजुतदार खेळाडूसारखा खेळायला लागला आहे. २००७ ते २००९ या काळात रोहितचा खेळ चांगला होता. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने दोन शतकंही झळकावली. मधल्या काळात पैसा आणि प्रसिद्धीमुळे त्यांच खेळाकडे दुर्लक्ष झालं होतं. तो क्रिकेटकडे गांभीर्याने पाहत नव्हता. यामुळेच त्याला २०११ विश्वचषक संघातली जागा गमवावी लागली. दिनेश लाड पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

रोहितला विश्वचषक संघात स्थान न मिळणं हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. त्यानंतर मी रोहितला घरी बोलवलं आणि समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. “केवळ क्रिकेटमुळे आज तु इकडे आहे. पैसा-प्रसिद्धी या सर्व गोष्टी तुला क्रिकेटमधून मिळालेल्या आहेत, पण तुझं तुझ्या खेळाकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे तू गांभीर्याने सराव करायला हवास. विराट तुझ्यानंतर संघात आला आहे, आणि आज तो भारतीय संघात आहे.” लाड यांनी प्रशिक्षकाच्या नात्याने रोहितची कानउघडणी केली.

सुदैवाने प्रशिक्षक दिनेश लाड यांनी दिलेल्या सल्ल्याचा रोहितवर चांगला परिणाम झाला. दुसऱ्या दिवसापासून रोहितने सकाळी सात ते संध्याकाळी पाच असं आपल्या सरावाचं वेळापत्रक बनवलं. याचसोबत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद मिळणं यामुळे देखील रोहित शर्माच्या खेळामध्ये कमालीचा बदल झाल्याचं दिनेश लाड म्हणाले. या सर्व गोष्टींनंतर रोहित शर्मा समजुतदारपणे खेळायला लागला. २०११ नंतर रोहित शर्माने केलेली प्रगती हे याचंच उदाहरण असल्याचं लाड म्हणाले.