रांची पाठोपाठ मोहालीच्या मैदानावरही भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला. फलंदाजीत चांगल्या सुरुवातीनंतरही गोलंदाजांचा स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण भारताला चांगलच महागात पडलं. शिखर धवनने या सामन्यात शतकी खेळी केली, त्याला रोहित शर्मानेही झंजावाती अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. या शतकी भागीदारीदरम्यान शिखर-रोहित जोडीने सचिन आणि सेहवाग या जोडीच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. शिखरने 143 तर रोहित शर्माने 95 धावांची खेळी केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 193 धावांची भागीदारी केली. ही भारताची वन-डे क्रिकेटमधली सलामीची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.

धवन-शर्मा जोडीने याआधी आपल्याच नावे विक्रम मोडला आहे. 2013 साली नागपूरच्या मैदानावर 178 तर 2013 साली जयपूरच्या मैदानावर 176 धावांची भागीदारी या जोडीने केली होती. याच्याआधी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची 175 धावांची भागीदारी ही वन-डे क्रिकेटमधली सर्वोत्तम भागीदारी होती.

वन-डे क्रिकेटमध्ये भारताची सलामीच्या जोडीसाठीची सर्वोत्तम भागीदारी पुढीलप्रमाणे –

रोहित शर्मा – शिखर धवन (193 धावा) – मोहाली 2019
रोहित शर्मा – शिखर धवन (178 धावा) – नागपूर 2013
रोहित शर्मा – शिखर धवन (176 धावा) – जयपूर 2013
सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली (175 धावा) – कानपूर 1998