दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर, भारतीय संघात रोहित शर्माच्या समावेशाबद्दल अनेकांनी उभ्या केलेल्या प्रश्नचिन्हाला आता पाठबळ मिळायला लागलं आहे. कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून रोहित शर्माला आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघात जागा देण्यात आली होती. मात्र या संधीचा रोहित शर्माला लाभ घेता आला नाही. दोन्ही डावांमध्ये रोहितची फलंदाजी बहरलीच नाही. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांच्या मते, रोहित कसोटी क्रिकेटमध्ये बचावात्मक खेळत असल्याने त्याच्या पदरी अपयश येत आहे. ते दक्षिण आफ्रिकेतून पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

“माझ्या दृष्टीकोनातून रोहित शर्मा एक तंत्रशुद्ध आणि गुणी फलंदाज आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये बचावात्मक खेळणं त्याच्या विरोधात जात आहे. रोहितकडे सचिन, राहुल, सुनिल गावसकर यासारख्या महान खेळाडूंएवढीच प्रतिभा आहे. मात्र परदेशी खेळपट्ट्यांवर रोहित चुकीच्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, या गोष्टीत सुधारणा केल्यास तो कसोटी क्रिकेटमध्येही चांगला खेळ करु शकेल.” एका खासगी कार्यक्रमात आलेले असताना जोन्स यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अवश्य वाचा – संधी द्यायची नव्हती मग अजिंक्य रहाणेला उप-कर्णधार का बनवलंत? – बिशनसिंह बेदी

यावेळी डीन जोन्स यांनी भारताला अधिकाधिक परदेशी दौऱ्यांची गरज असल्याचं म्हटलं. ” दक्षिण आफ्रिका किंवा यासारख्या देशांमधल्या दौऱ्यातून तुम्ही तुमच्या संघातल्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने पारख करु शकता. अशा दौऱ्यांमधून एक सर्वोत्तम संघ उभा केला जाऊ शकतो. ज्या पद्धतीने विराट आणि रवी शास्त्री यांनी रोहितला संधी दिली आहे, त्यावरुन एक गोष्ट निश्चीत आहे की पुढच्या मालिकेत रोहित अपयशी ठरला तर त्याला संधी मिळणार नाही.” भारत आणि आफ्रिका यांच्यातली तिसरी कसोटी २४ जानेवारीरोजी जोहान्सबर्ग येथे सुरु होणार आहे.