विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत आश्वासक कामगिरी केली आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या सामन्यानंतर विराट आणि रोहित शर्मा यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांसमोर आल्या होत्या. विराटने या वृत्ताचा इन्कार केला असला तरीही याच काळात भारतीय संघाचं कर्णधारपद विभागून देण्यात यावं असा मुद्दा चर्चेला आला. महेंद्रसिंह धोनीच्या काळात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा तयार केला. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते कर्णधार म्हणून धोनी आणि रोहित यांच्या शैलीत बरंच साम्य आहे.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व करावं !

“रोहित कर्णधार म्हणून धोनीसारखाच आहे. तो कर्णधार म्हणून मैदानात उतरतो तेव्हा सर्व गोष्टी थंड डोक्याने करतो, संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं कामही तो चांगल्या पद्धतीने निभावतो. त्याचा स्वभाव थोडा बिनधास्त स्वरुपाचा आहे. त्याला माहिती आहे, ज्यावेळी तो मैदानात उतरणार आहे तो धावा करणारच आहे. त्यामुळे आपल्यासोबतच्या खेळाडूंनाही तो अशाच स्वरुपाचा आत्मविश्वास आणि पाठींबा देत असतो. रोहितची ही गोष्ट मला नेहमी आवडते.” रैना एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“काही दिवसांपूर्वी मी मुंबई विरुद्ध पुणे ही आयपीएलची फायनल बघत होतो. अत्यंत खडतर परिस्थिती रोहितने २-३ निर्णय घेतले, ज्यामुळे क्षणार्धात सामना पालटला. साहजिक आहे अशा वेळी त्याला ड्रेसिंग रुममधून काही सल्ले येत असणार, पण कर्णधार म्हणून स्वतःच्या डोक्यात एक रणनिती तयार असतेच. रोहित आयपीएलमध्ये म्हणूनच एक यशस्वी कर्णधार आहे”, रैना रोहित शर्माचं कौतुक करत होता. सध्या करोना विषाणूमुळे सर्व क्रिकेट सामने बंद आहेत, केंद्र सरकारने मैदानं आणि Sports Complex सरावासाठी खुली करण्यासाठी परवानगी दिली असली तरीही मुंबई रेड झोन एरियात येत असल्यामुळे रोहित शर्मला पुढचे काही दिवस सराव करता येणार नाहीये.