क्रिकेटच्या मैदानावर रोज नवनव्या घटना घडत असतात. कधी एखादा फलंदाज अफलातून फटका खेळतो, तर कधी एखादा गोलंदाज अविस्मरणीय असा चेंडू टाकून फलंदाजाचा त्रिफळा उडवतो. कधी खेळाडू अप्रतिम फिल्डींग करून झेल टिपतो, तर कधी लांबून थेट थ्रो करून रन-आऊट करतो. पण सध्या एका गोलंदाजांने आपल्याच गोलंदाजीवर रन-आऊट केल्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

रोमानियाचा खेळाडू पावेल फ्लोरीन हा त्याच्या विचित्र पद्धतीच्या गोलंदाजी शैली (bowling action) मुळे चर्चेत होता. त्याने नुकताच त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो गोलंदाजी करताना त्यानेच केलेल्या फलंदाजाला रन-आऊट केल्याचे दिसून येत आहे. सरे हिल्स सीसी या मेलबर्नमधील संघाकडून एका दर्शनी सामन्यात खेळण्यासाठी त्याला बोलवण्यात आले होते.

शनिवारी त्याने या संदर्भातील व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्याने गोलंदाजी केली. त्याने टाकलेला चेंडू फलंदाजाने जोर काढून टोलवला, पण तो चेंडू थेट गोलंदाजाकडेच परतला. चेंडू गोलंदाजाकडे परतल्यावर तो चेंडू रोखण्याचा प्रयत्न त्याने केला. त्या दरम्यान, चेंडू स्टंपला लागला आणि नॉन-स्ट्राईकवरील फलंदाज बाद झाला.

सगळ्या गोष्टी इतक्या पटापट घडल्या की गोलंदाजाला प्रथम काहीही कळले नाही. पण ज्यावेळी पंचांनी त्याला बाद घोषित केले, तेव्हा मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर पावेल फ्लोरीनने लहान मुलासारखा उड्या मारत आनंद साजरा केला.