‘‘रौनक पंडित माझे पती आणि प्रशिक्षक आहेत. गेली तीन वर्ष मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळते आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून त्यांना सहभागी करून घ्यावे अशी विनंती मी राष्ट्रीय नेमबाजी संघटनेला केली होती. मात्र मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आयत्या वेळी रौनकला भारतीय पथकातून वगळल्याचे मला सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी काही खेळाडूंच्या नातेवाईकांना विशेष पात्रता नसताना भारतीय चमूत सामील करण्यात आले. न्याय सगळ्यांसाठी समान हवा. माझी विनंती नाकारण्यात आली याचे वाईट वाटले नाही. मात्र व्यक्तीपरत्वे भूमिका बदलते हे निराशाजनक आहे, ’’असे मत अव्वल नेमबाज हिना सिद्धूने व्यक्त केले. ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ती बोलत होती.
ती पुढे म्हणाली, ‘‘रौनक माझे पती आहेत म्हणून त्यांना सहभागी करावे अशी माझी भूमिका नव्हती. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्याने इन्चॉन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रौनकला अधिस्वीकृती पत्र मिळाले. मात्र अधिकृतरीत्या भारतीय चमूचा भाग नसल्याने निवास-प्रवासाचा खर्च त्यांना करावा लागला. सुदैवाने त्यांनी हा खर्च पेलत मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मला सांघिक प्रकारात पदक मिळू शकले. प्रत्येक खेळाडूची मागणी पूर्ण करता येऊ शकत नाही कारण संयोजकांच्याही मर्यादा असतात, परंतु याविषयी आधीच स्पष्ट आणि पारदर्शक भूमिका घेतल्यास खेळाडूंना फायदा होऊ शकतो.’’
जागतिक क्रमवारीत पिस्तूल क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर हिनाच्या कामगिरीत घसरण झाली आहे. त्याविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘‘काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. स्पेन येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आटोपून आम्ही काही तासांत इन्चॉनला पोहचलो. आमच्या लढती लगेचच होत्या. खराब कामगिरीसाठी ही सबब नाही, मात्र नेमबाजी एकाग्रतेचा खेळ आहे. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.’’

सैफ अली खान ‘ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट’चा सदिच्छादूत
खेळाडूंना साहाय्य करणाऱ्या ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संघटनेने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती केली. अभिनय क्षेत्रात सैफचे योगदान महत्त्वाचे आहे. घरातूनच त्याला खेळाचा वारसा लाभला आहे. त्याची लोकप्रियता खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेन रस्क्विन्हा यांनी सांगितले. ऑलिम्पिकपर्यंत दरवर्षी वैयक्तिक २० लाख रुपये ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या माध्यमातून देणार असल्याचे सैफ अली खानने यावेळी सांगितले.

आशियाई पदक विजेत्यांचा सत्कार
यावेळी श्वेता चौधरी (१० मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक), प्रकाश नानजप्पा (१० मीटर एअर पिस्तूल सांघिक कांस्यपदक), संजीव राजपूत (१० मीटर एअर रायफल सांघिक कांस्य), राही सरनोबत(२५ मीटर पिस्तूल सांघिक कांस्य) हिना सिद्धू(२५ मीटर पिस्तूल सांघिक कांस्य) आणि जितू राय(५० मीटर पिस्तूल वैयक्तिक सुवर्णपदक आणि १० मीटर एअर पिस्तूल सांघिक कांस्य) यांना सन्माानित करण्यात आले