घरातूनच नेमबाजीचा वारसा मिळालेल्या अव्वल नेमबाज रौनक पंडितने वरळी येथे सुरू असलेल्या राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. अटीतटीच्या अंतिम लढतीत रौनकने १९७.१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. कोल्हापूरच्या विनय पाटीलने १९६.२ गुणांसह रौप्यपदक मिळवले. १९व्या फेरीपर्यंत रौनक आणि विनय यांची बरोबरी होती. शेवटच्या प्रयत्नात रौनकने १०.७ असा तर विनयने ९.८ असा लक्ष्यभेद केला. अगदी थोडय़ा फरकाने विनयचे सुवर्णपदक हुकले. साताऱ्याच्या महेश घाडगेने १७३ गुणांसह कांस्यपदक मिळवले.
१० मीटर एअर पिस्तूल कनिष्ठ गटात, नाशिकच्या संचित आगाशेने ६०० पैकी ५६५ गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. कोल्हापूरच्या आल्शय कुमार मलिकने ५६४ गुणांसह रौप्यपदक तर रत्नागिरीच्या राहुल पाटीलने ५६३ गुणांसह कांस्यपदक पटकावले. १० मीटर एअर पिस्तूल युवा गटात मुंबईकर मुदित हिरभगतने सुवर्णपदक नावावर केले. त्याने ६०० गुणांसह ५६४ गुण मिळवले. नाशिकच्या प्रदीप निघोतेने ५५९ गुणांसह रौप्य तर तरुण वासुदेवनने ५५२ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.