सलग नऊ वेळा सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या युव्हेंटसला रविवारी मध्यरात्री रोमाविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करावी लागली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटसने पिछाडीवरून मुसंडी मारत एका गुणाची कमाई केली.

जॉर्डन वेरेटाऊट याने ३१व्या मिनिटालाच पेनल्टीवर गोल झळकावत रोमा संघाला आघाडीवर आणले होते. त्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरीस रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत युव्हेंट्सला बरोबरी साधून दिली. पण दोन मिनिटांनीच वेरेटाऊटने दुसरा गोल करत पुन्हा एकदा रोमाला आघाडीवर आणले. ६२व्या मिनिटाला एड्रियन रॅबियट याला पंचांनी लाल कार्ड दाखवल्यामुळे युव्हेंटसला १० जणांसह खेळावे लागले. मात्र सात मिनिटांनी रोनाल्डोने सामन्यातील दुसरा गोल लगावत युव्हेंटसला बरोबरी साधून दिली.

लिसेस्टरचा मँचेस्टर सिटीला धक्का

जेमी वार्डीच्या हॅट्ट्रिकमुळे लिसेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये बलाढय़ मँचेस्टर सिटीचा ५-२ असा धुव्वा उडवला. वार्डीचा वेगवान खेळ आणि अप्रतिम चालींना मँचेस्टर सिटीकडे उत्तर नव्हते. वार्डीने दमदार आक्रमक खेळ करत दोन पेनल्टी मिळवल्या, त्यावर दोन गोल करत त्याने लिसेस्टरला आघाडीवर आणले. अन्य सामन्यात, वेस्टहॅम युनायटेडने वुल्व्हसचा ४-० असा पाडाव केला. जेरॉड बोवेनचे दोन गोल तसेच राऊल जिमेनेझ आणि सेबॅस्टियन हलेरने एक गोल करत विजयात योगदान दिले.

पॅरिस सेंट जर्मेनचा सलग तिसरा विजय

आघाडीवीर माऊरो इकार्डी याच्या दोन गोलच्या बळावर पॅरिस सेंट जर्मेनने फ्रेंच लीग-१मध्ये रेइम्स संघाचा २-० असा पराभव केला. पॅरिस सेंट जर्मेनचा हा सलग तिसरा विजय ठरला. नेयमारला सलग तीन सामन्यात गोल करण्यात अपयश आले. या विजयामुळे पॅरिस सेंट जर्मेनने पाच सामन्यांत नऊ गुणांसह सातवे स्थान प्राप्त केले आहे.