विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील स्वीडनविरुद्धच्या प्ले-ऑफ सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो याने विजयात बजावलेल्या मोलाच्या भूमिकेमुळे पोर्तुगाल संघाने आंतरराष्ट्रीय फूटबॉल महासंघाच्या (फिफा) क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.
स्वीडनवर ०-१ आणि २-३ अशा गोलफरकाने मिळवलेल्या विजयामुळे पोर्तुगालने क्रमवारीत नऊ स्थानांनी मुसंडी मारली आहे. विश्वविजेत्या स्पेनने १५०७ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानावर आपला दबदबा कायम राखला आहे. स्पेनपाठोपाठ जर्मनी, अर्जेटिना आणि कोलंबिया या संघांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे. उरुग्वे सहाव्या तर इटली सातव्या स्थानी आहे. स्वित्र्झलडने आठवे आणि नेदरलॅण्ड्सने नववे स्थान प्राप्त केले आहे. ब्राझीलने अव्वल दहा जणांमध्ये मजल मारली आहे.
बेल्जियमच्या क्रमवारीत सहा क्रमांकानी घसरण झाली असून ते ११व्या स्थानी पोहोचले आहेत. अमेरिका संघ १४व्या स्थानी पोहोचला आहे. आफ्रिकन देशांमध्ये आयव्हरी कोस्ट सर्वोत्तम १७व्या स्थानी आहे. आशियाई देशांमधून इराणने ४५वे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय संघ फिफा क्रमवारीत १४९ गुणांसह १४८व्या स्थानी आहे.