एएफपी, पॅरिस

नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅट्ट्रिकसह साकारलेल्या चार गोलच्या बळावर पोर्तुगालने मंगळवारी रात्री झालेल्या युरो २०२० पात्रता फुटबॉल स्पर्धेत ‘ब’ गटातील लिथुआनियाचा ५-१ असा धुव्वा उडवला.

कारकीर्दीतील १६०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या रोनाल्डोने ७, ६१, ६५ आणि ७६व्या मिनिटाला अनुक्रमे चार गोल नोंदवले. तर विल्यम कार्वेल्होने भरपाई वेळेत (९०+२) संघासाठी पाचवा गोल केला. लिथुआनियातर्फे व्यातुसास आंद्रेसेव्हिसने २८व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदवला. ३४ वर्षीय रोनाल्डोची ही आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील दुसरी हॅट्ट्रिक ठरली आहे.

इंग्लंडची कोसोव्होवर मात

इंग्लंडने कोसोव्होवर ५-३ अशी मात केली. ‘अ’ गटातील या सामन्यात इंग्लंडसाठी जॅडन सांचोने दोन गोल केले. त्याला रहीम स्टर्लिग, हॅरी केन यांनी प्रत्येकी एक गोल करून सुरेख साथ दिली. तर मर्गेम व्हजवोडाच्या स्वयंगोलमुळे इंग्लंडची एकूण गोलसंख्या पाच झाली. कोसोव्होतर्फे व्हलन बेरोशाने दोन, तर व्हर्नन मुरिकीने एक गोल केला.

फ्रान्सकडून अँडोरा पराभूत

किंग्सले कोमॅन, सेल्मंट लिंग्लेट आणि विसम बेन यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर फ्रान्सने अँडोराचा ३-० असा पराभव केला. स्टेड दी फ्रान्स येथील स्टेडियमवर ‘ह’ गटातील या सामन्यात फ्रान्ससाठी किंग्सलेने १८व्या मिनिटाला पहिला, लिंग्लेटने ५२व्या मिनिटाला दुसरा आणि विसमने ९०व्या मिनिटाला तिसरा गोल केला.