मँचेस्टर युनायटेड-रिअल माद्रिद यांच्यातील लढत १-१ने बरोबरीत
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
‘व्हॅलेन्टाइन डे’च्या पूर्वसंध्येला फुटबॉलशौकिनांना मँचेस्टर युनायटेड आणि रिअल माद्रिद या बलाढय़ संघांमधील सामन्याची पर्वणी अनुभवता आली. जगभरातील जवळपास २०० दशलक्ष चाहत्यांनी या चित्तथरारक सामन्याचा आनंद लुटला. डॅनी वेलबॅकने मँचेस्टर युनायटेडला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. पण रिअल माद्रिदसाठी त्यांचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो धावून आला. रोनाल्डोच्या गोलमुळे रिअल माद्रिदने या सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांना एकही गोल करता न आल्याने ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली.
चॅम्पियन्स लीगमधील अव्वल १६ जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात रिअल माद्रिदने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अग्रस्थानी असलेल्या मँचेस्टर युनायटेडला सुरुवातीला चांगलेच झुंजवले. मात्र दिएगो लोपेझ याच्या पासवर वेलबॅकने २०व्या मिनिटाला युनायटेडला आघाडीवर आणले. १० मिनिटांनंतर रोनाल्डोने गोल करून माद्रिदला बरोबरी मिळवून दिली. २००९मध्ये युनायटेडकडून माद्रिदमध्ये सामील झालेल्या रोनाल्डोने या गोलनंतर जल्लोष केला नाही. आता दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत हे दोन्ही संघ पुन्हा ५ मार्चला एकमेकांशी झुंजतील.
बोरूसिया डॉर्टमंड आणि शख्तार डोनेत्सक यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत राहिला तरी या सामन्यावर अपघाताची सावली पडली. सामना सुरू असतानाच युक्रेनच्या विमानतळावर झालेल्या विमानदुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला.

युनायटेडकडून सहा वर्षे खेळल्यामुळे या क्लबविषयी स्नेहभाव असणे स्वाभाविक आहे. बचावात युनायटेड संघ भक्कम असल्यामुळे आम्हाला गोल करताना अडचणी येत होत्या. पण संधी मिळाली, तेव्हा गोल करून आम्ही सामन्यात बरोबरी साधली.
-ख्रिस्तियानो रोनाल्डो