ख्रिस्तियानो रोनाल्डोने सलग तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद करताना पोर्तुगाल संघाला युरोपियन अजिंक्यपद पात्रता स्पध्रेत अर्मेनियावर ३-२ असा विजय मिळवून दिला. या विजयासह पोर्तुगालने ‘आय’ गटात डेन्मार्कवर दोन गुणांची आघाडी घेत अव्वल स्थान कायम राखले आहे.
मार्कोस पिझ्झेलीने १४व्या मिनिटाला ३० यार्डावरून टोलावलेला चेंडू गोलरक्षकाला अडविण्यात अपयश आले आणि अर्मेनियाने १-० अशी आघाडी घेतली. मात्र, २९व्या मिनिटाला रोनाल्डोने पोर्तुगालला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत होता. मध्यंतरानंतर रोनाल्डोने आक्रमक खेळ करताना अवघ्या तीन मिनिटांत दोन गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली आणि संघाला ३-१ अशा आघाडीवर आणले. रोनाल्डोच्या या आक्रमणासमोर अर्मेनिया संघ भेदरला. ६२व्या मिनिटाला थिएगोला लाल कार्ड दाखविण्यात आल्याने पोर्तुगालला दहा खेळाडूंसह पुढचा डाव कायम करावा लागला. त्याचा फायदा उचलत ७२व्या मिनिटाला ऱ्हायर कोयानने गोल करून अर्मेनियाला पुनरागमन करण्याची संधी मिळवून दिली. मात्र, त्याचे हे प्रयत्न निकामी ठरवत पोर्तुगालने ३-२ असा विजय निश्चित केला.