झुरिच : भरपाई वेळेत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या लक्षवेधी खेळामुळे युरोपियन विजेत्या पोर्तुगालने मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात इजिप्तचा २-१ असा पराभव केला. मोहम्मद सलाहच्या गोलमुळे इजिप्तने ९२ मिनिटांपर्यंत आघाडी टिकवून ठेवली होती.

रोनाल्डोने आपल्या कारकीर्दीतील नवशेव्या सामन्यात आपला हुकमी प्रभाव दाखवला. भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला त्याने रिकाडरे क्वारेश्माच्या क्रॉसवर हेडरद्वारे गोल करीत पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. त्यानंतर चौथ्या मिनिटाला विजयी गोल साकारत इजिप्तला धक्का दिला.

त्याआधी, लिव्हरपूलकडून यंदाच्या हंगामात २८ गोल करणाऱ्या सलाहने ५६व्या मिनिटाला इजिप्तचे खाते उघडले. त्यातून सावरण्यासाठी पोर्तुगालने कडवा संघर्ष केला.

इंग्लंडकडून नेदरलँड्सचा पाडाव

अ‍ॅमस्टरडॅम : जेसी लिंगार्डच्या पहिल्यावहिल्या गोलच्या बळावर इंग्लंडने नेदरलँड्सचा १-० असा पाडाव केला. रशियात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी जाण्यापूर्वी इंग्लंडचा हा अखेरचा परदेशातील सामना होता. महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत विश्वचषकासाठी सज्ज होणाऱ्या नेदरलँड्सला अपेक्षेप्रमाणे प्रतिकार करता आला नाही.

कोलंबियाचा फ्रान्सला धक्का

पॅरिस : सामना संपायला पाच मिनिटांचा अवधी असताना बदली खेळाडू ज्युआन क्विंटेरोने पेनल्टीद्वारे गोल साकारत कोलंबियाच्या विजयाचा अध्याय लिहिला. फ्रान्सने सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी कोलंबियाचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र ६२व्या मिनिटाला फ्रान्सने बरोबरी साधण्यात यश मिळवले.

मेसीच्या अनुपस्थितीत अर्जेटिनाची इटलीवर मात

मँचेस्टर : लिओनेल मेसीच्या अनुपस्थितीत एव्हर बॅनेगाने जगज्जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या अर्जेटिनाची कामगिरी दर्जाला साजेशी राखली. एतिहाद स्टेडियमवर झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेटिनाने इटलीचा २-० असा पराभव केला.

गुरुवारी सराव सत्रात मेसीच्या मांडीचा सांधा दुखावला आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण सामन्यात मेसीच्या जागी बदली खेळाडू खेळवावा लागत आहे. इटलीविरुद्धच्या सामन्यात उत्तरार्धात बॅनेगा आणि मॅन्युएल लॅन्झीनी यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

जर्मनीला स्पेनने बरोबरीत रोखले

डसेलडॉर्फ : स्पेनने विश्वविजेत्या जर्मनीला १-१ असे बरोबरीत रोखले. या सामन्यात संघ कुठे कमी पडला, याची मला जाणीव आहे, असे जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक जोआकिम लो यांनी सांगितले.

रॉड्रिगो मोरेनोने सहाव्या मिनिटाला गोल करीत स्पेनला आघाडी मिळवून दिली. मात्र थॉमस म्यूलरने जर्मनीला बरोबरी साधून दिली. हा म्यूलरचा ९०वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.