फुटबॉलचा अव्वल दर्जाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला बार्सिलोना क्लबकडून खेळण्याचे निमंत्रण आले होते, मात्र त्याने रिअल माद्रिद क्लबकडून खेळण्यास प्राधान्य दिले होते, असे ज्येष्ठ संघटक रॅमोन काल्डेरॉन यांनी सांगितले.
रोनाल्डो याने २००९ मध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबला रामराम ठोकला व तब्बल ९४ दशलक्ष युरो मानधनाचा करार करीत रिअल माद्रिद क्लबचे सदस्यत्व स्वीकारले होते. त्या वेळी तो व्यावसायिक खेळाडूंमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. हा करार होण्यापूर्वी मँचेस्टर युनायटेडचे व्यवस्थापक सर अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांनी रोनाल्डो याने बार्सिलोना क्लबशी करार करावा यासाठी खूप प्रयत्न केले होत, मात्र रोनाल्डोने त्यास सपशेल नकार दिला होता असेही रॅमोन यांनी सांगितले.
रोनाल्डो याला ब्लाऊग्रानाकडे पाठविण्याचा प्रयत्न झाला होता काय, असे विचारले असता रॅमोन म्हणाले, हो. बार्सिलोनाकडून खेळण्यासाठी रोनाल्डोची मानसिक तयारी करण्यात आली होती. तो बार्सिलोनाकडून खेळणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. मात्र ऐन वेळी रोनाल्डो याला आपल्याकडे खेचण्यात रिअल माद्रिदचे संघटक यशस्वी झाले. रोनाल्डो हा महान खेळाडू आहे. त्याने या मोसमात रिअलकडून खेळताना २१ सामन्यांमध्ये २२ गोल केले आहेत. एकाग्रतेने सराव करण्यात तो माहीर आहे. प्रत्येक दिवशी तो गृहपाठ करतो व आपल्या खेळातील चुका दुरुस्त करण्यावर भर देत असतो.
आपल्या संघासाठी खेळताना शंभर टक्के कामगिरी करणे महत्त्वाचे असते. रोनाल्डो हा प्रत्येक वेळी ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतो. अन्य युवा खेळाडूंपुढे त्याचाच आदर्श आहे, असेही रॅमोन म्हणाले.