इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा

सुरुवातीलाच पिछाडीवर पडल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलमुळे युव्हेंट्सने इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात इंटर मिलानचा २-१ असा पराभव केला.

लॉटारो मार्टिनेझ याने नवव्या मिनिटालाच इंटर मिलानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रोनाल्डोने २६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर ३५व्या मिनिटाला इंटर मिलानच्या बचावपटूंच्या ढिसाळ कामगिरीमुळे रोनाल्डोने दुसरा गोल करत युव्हेंट्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पुढील आठवडय़ात होणाऱ्या परतीच्या लढतीत युव्हेंट्सने ही आघाडी कायम राखली तर त्यांना १९ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत नापोली आणि अ‍ॅटलांटा यांच्यातील विजेत्याशी लढावे लागेल.

युनायटेडचा सर्वात मोठा विजय

मँचेस्टर युनायटेडने नऊ जणांसह खेळणाऱ्या साऊदम्प्टनचा ९-० असा पराभव करत इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमधील सर्वात मोठय़ा विजयाची नोंद केली. अँथनी मार्शलचे दोन गोल तसेच आरोन व्हॅन बिसाका, मार्कस रॅशफोर्ड, इडिन्सन कावानी, स्कॉट मॅकटोमिनाय, ब्रूनो फर्नाडेस आणि डॅनियल जेम्स यांनी विजयात योगदान दिले. यासह युनायटेडने ४४ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे. मँचेस्टर सिटी गोलफरकाच्या आधारावर  अग्रस्थानी आहे.