करोनामुळे संपूर्ण क्रीडाक्षेत्र  आर्थिक नुकसान सोसत असताना आता अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच त्याचे युव्हेंटसचे सहकारी आणि प्रशिक्षक मॉरिझियो सारी हे वेतनकपातीस तयार झाले आहेत. यामुळे युव्हेंटस क्लबची बचत होणाऱ्या ७५२ कोटी रुपयांतून एक तृतियांश खेळाडूंना चार महिन्यांचा पगार देता येणार आहे.

युव्हेंटसचा कर्णधार जॉर्जियो चिएलिनी याबाबतीत सध्या क्लबशी आणि सहकाऱ्यांशी चर्चा करत आहे. ‘‘सध्या फुटबॉलचा मोसम थबकला असताना क्लब खेळाडूंशी विश्वासाने याविषयी बोलणी करत आहे. या कठीण काळात खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या बांधिलकीप्रती आम्ही त्यांचे ऋणी आहोत,’’ असे युव्हेंटसकडून सांगण्यात आले.

सेरी-ए फुटबॉल स्पर्धेचे विक्रमी नववे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेला युव्हेंटस संघ गुणतालिकेत लॅझियोपेक्षा एका गुणाने अव्वल स्थानी आहे. डॅनिएल रुगानी, ब्लेस मतौडी आणि पावलो डायबाला या युव्हेंटसच्या तीन खेळाडूंना करोनाची बाधा झाली आहे.

क्रीडामंत्र्यांकडून एका महिन्याचा पगार मदत निधीला

केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी आपले एका महिन्याचे मानधन करोनाच्या लढय़ासाठी पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा केले आहे. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आपत्ती व्यवस्थापन क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी तसेच करोनापासून देशबांधवांचे रक्षण करण्यासाठी शक्य तितकी मदत करण्याचे आवाहन जनतेला तसेच भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना केले आहे. त्यानुसार मी माझे एक महिन्याचे मानधन या निधीसाठी देत आहे,’’ असे रिजिजू यांनी म्हटले आहे.

रिचा, शरद कुमारकडून एक लाखाची मदत

१६ वर्षीय महिला क्रिकेटपटू रिचा घोष आणि पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावणारा शरद कुमार यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीला दिली आहे. रिचाचे वडील मनबेंद्र घोष यांनी सिलिगुडी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे, असे बंगाल क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे.