अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने  सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला २-१ नमवले. रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये ५० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला. या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

येत्या आठवडय़ातच युव्हेंटसला विजेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याची संधी आहे. अजून या स्पर्धेत चार लढती बाकी असल्या तरी युव्हेंटसला इंटर मिलानवर आठ गुणांची आघाडी घेता आली आहे. युव्हेंटसने लॅझियोविरुद्ध सलग तिसरा विजय नोंदवला आहे. युव्हेंटसला डिसेंबरमध्ये सेरी ए आणि इटालियन सुपर चषकात लॅझियोकडून सलग दोन पराभव स्वीकारावे लागले होते. रोनाल्डोने ५१व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर ५४व्या मिनिटाला दुसरा गोल केला. लॅझियोकडून फुटबॉलपटू सिरो इमोबाईलने ८३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. रोनाल्डो आणि सिरो यांनी या स्पर्धेच्या हंगामात सर्वाधिक प्रत्येकी ३० गोल नोंदवले आहेत.

रोनाल्डो सेरी-एमध्येही सर्वात वेगवान ५० गोल करणारा फुटबॉलपटू ठरला. ‘‘विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, मात्र संघाचा विजय झाला ही महत्त्वपूर्ण बाब आहे. आमचा युव्हेंटस संघ सर्वोत्तम असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. यापुढेही आम्हाला अशीच उंचावलेली कामगिरी करायची आहे,’’ असे रोनाल्डोने सांगितले.

व्हॉल्व्जच्या युरोपा लीगच्या आशा कायम

व्हॉल्व्हरहॅम्पटन : व्हॉल्व्जने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) क्रिस्टल पॅलेसला २-० नमवत युरोपा लीगला पात्र ठरण्याच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. याबरोबरच व्हॉल्व्जने ३७ सामन्यांतून ५९ गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. डॅनियल पॉडेन्स आणि जोनाथन कॅस्ट्रो यांनी केलेला प्रत्येकी एक गोल व्हॉल्व्जच्या विजयात मोलाचा ठरला.