जगभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. जगभरात करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या काही हजारांवर पोहचलेली असून, भारतामध्येही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि सर्व संबंधित यंत्रणांकडून या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. क्रीडा क्षेत्रालाही करोना विषाणूचा फटका बसला आहे. अनेक महत्वाच्या स्पर्धा करोनामुळे रद्द झाल्या असून…ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांवरही करोनामुळे गंडातर आलंय.

अशातच जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने करोनाग्रस्त रुग्णांसाठी महत्वाचं पाऊल टाकलं आहे. रोनाल्डोने आपल्या पोर्तुगालमधील सर्व हॉटेलचं रुपांतर रुग्णालयात केलं असून…सर्व संक्रमित रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याचसोबत करोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा खर्चही रोनाल्डो स्वतः उचलणार आहे.

दरम्यान सर्व महत्वाच्या फुटबॉल स्पर्धा रद्द झाल्यामुळे रोनाल्डो आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. रोनाल्डोने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

आतापर्यंत चीनमध्ये करोनामुळे सर्वाधिक रुग्ण संक्रमित झाले असून त्याखालोखाल इटलीमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. भारतामध्येही मुंबई, दिल्ली यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत.