ट्रेंट बोल्टचे सहा बळी आणि रॉस टेलरचे शतक यांच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करून मालिकासुद्धा २-० अशा फरकाने जिंकली.

न्यूझीलंडने चॅपेल-हेडली करंडकावर पुन्हा दावेदारी केली असताना ऑस्ट्रेलियाने मात्र जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील निर्विवाद वर्चस्व गमावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर दक्षिण आफ्रिकेइतकेच ११८ गुण जमा आहेत. आता मालिकेतील उर्वरित दोन सामने जिंकल्यास दक्षिण आफ्रिका क्रमवारीत अव्वल स्थान गाठेल.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २८१ धावा केल्या. टेलरने १०१ चेंडूंत १०७ धावा केल्या, तर डी बाऊनलीने ६३ धाव केल्या. त्यानंतर आरोन फिन्च आणि शॉन मार्श यांनी ऑस्ट्रेलियासाठी दमदार सलामी नोंदवली. मात्र त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले. फिन्च आणि ट्रॅव्हिस हेडने अर्धशतके झळकावली.

 

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर आरामात विजय

जोहान्सबर्ग : वाँडर्स स्टेडियमवर मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे एक तास उशिरा सुरू झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर सात विकेट्स राखून आरामात विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम श्रीलंकेला ३९.२ षटकांत १६३ धावांवर गुंडाळले. यात ड्वेन प्रीटोरियसने १९ धावांत ३ बळी घेण्याची किमया साधली. त्यानंतर ३२ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेने आव्हान पार केले. कर्णधार एबी डी’व्हिलियर्सने ६० धावांची नाबाद खेळी साकारली.

वाँडर्सवर स्तनांच्या कर्करोगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गुलाबी दिन साजरा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि मोठय़ा संख्येने चाहत्यांनी गुलाबी कपडे परिधान केले होते. मात्र या महत्त्वाच्या दिवशी धावांचा वर्षांव न होऊ शकल्याबद्दल डी’व्हिलियर्सने दिलगिरी प्रकट केली.