प्रशांत केणी

इंग्लंडमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची योजना ४८ सामन्यांची. अव्वल चार संघ अखेपर्यंत स्पष्ट होऊ नये, यासाठी ४५ सामन्यांपर्यंत राऊंड रॉबिन पद्धतीनुसार साखळी सामने, मग दोन उपांत्य आणि एक अंतिम असे समीकरण मांडण्यात आले; पण २७ सामने झाले असतानाच बाद फेरीचे चार संघ स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे राऊंड रॉबिन पद्धतीचे उणेपण प्रकर्षांने चर्चेत आले आहे.

विश्वचषक दिवसांच्या आकडेमोडीत अर्ध्यावरही आलेला नाही आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीत जाणार हे स्पष्च झालेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत फक्त धावांचा पाऊस, विक्रम आणि या चौघांचे क्रम ठरू शकतील. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांनी विश्वचषकातील गाशा गुंडाळला आहे. उर्वरित सामने खेळण्याचे सोपस्कार करण्याशिवाय पर्याय त्यांच्यापुढे नाही. पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज आता फारसा प्रभाव दाखवतील, अशी लक्षणे दिसत नाहीत. बांगलादेशच्या संघाकडूनच आता अनपेक्षित धक्क्यांची अपेक्षा करता येईल. त्यांचे उर्वरित तीन सामने अनुक्रमे अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान या आशियाई सहसंघांसोबतच आहे. यापैकी अफगाणिस्तानला नमवणे बांगलादेशसाठी मुळीच अवघड नाही, तर पाकिस्तानपुढे त्यांचे पारडे जड दिसते आहे; परंतु भारताचे आव्हान त्यांना कठीण जाईल. याच बांगलादेशने २००७च्या विश्वचषकात भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आणले होते. त्यामुळे एकंदरीत बांगलादेश हा एकच संघ आता विश्वचषकामधील थरार टिकवू शकतो.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या १२ स्पर्धाचा आढावा घेतल्यास ११ स्पर्धामध्ये गटसाखळीचे सूत्र वापरण्यात आले होते. अपवाद फक्त १९९२च्या विश्वचषकाचा होता. त्या वेळी राऊंड रॉबिन पद्धतीचा वापर करण्यात आला होता; पण त्या वेळी हे सूत्र १०० टक्के यशस्वी ठरले होते. साखळी सामन्यांच्या अखेरच्या दिवशी असलेल्या तीन सामन्यांनी अंतिम चार संघ निश्चित केले. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून नऊ गुणांसह बाद फेरीतील चौथे स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या खात्यावर प्रत्येकी आठ गुण जमा होते. या संघांमधील निव्वळ धावगतीचे अंतरही माफक होते. हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला असता तर ते १० गुणांसह हमखास बाद फेरीत पोहोचले असते. याचप्रमाणे पाकिस्तानने अखेरचा सामना गमावला असता तर विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एका संघाला पुढे जाता आले असते.

पण दुर्दैवाने १९९२ची मात्रा यंदाच्या विश्वचषकात चालली नाही. या पद्धतीमधील कच्चे दुवे समोर आले आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आतापर्यंत झालेल्या १२ हंगामांमध्ये दुहेरी राऊंड रॉबिन लीगचे सूत्र यशस्वीपणे वापरले गेले आहे. बऱ्याचदा साखळी सामन्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत ही उत्कंठा टिकलेली आहे. पुढील विश्वचषक स्पर्धा १० संघांमध्ये २०२३ मध्ये भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठीसुद्धा राऊंड रॉबिन पद्धत वापरली जाणार आहे; परंतु यंदाच्या विश्वचषकाचा आढावा घेतल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) त्याचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

१९९२चे राऊंड रॉबिन लीगचे सूत्र पुन्हा अमलात आणल्याबद्दल सर्वप्रथमच ‘आयसीसी’चे अभिनंदन करायला हवे. या पद्धतीत १० संघांना अन्य प्रत्येक संघासोबत नऊ सामने खेळायचे आहेत. म्हणजे प्रत्येक संघाला समान संधी आहे. याशिवाय गटसाखळीतील बलाढय़ किंवा कमकुवत संघांचा गट असे शिक्के मारायला जागा उरली नाही. गटसाखळीत एखाद्या धक्कादायक निकालामुळे बाद फेरीचे चित्र पालटते. मग गटसाखळीचा टप्पा पार करणारा कमकुवत संघ बाद फेरीत सहज हार मानतो, हे क्रिकेटविश्वाने अनुभवले आहे. जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल पाच संघांपैकीच चार संघ विश्वचषकात पुढे दिसत आहेत. यापैकी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यासाठी तेथील वातावरण पूरक असेच आहे; परंतु भारत हा एकमेव आशियाई संघ या वातावरणालाही अनुकूलता दाखवत सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे.

– सुलक्षण कुलकर्णी, मुंबईचे माजी प्रशिक्षक