नाशिकचा नौकानयनपटू दत्तू भोकनळच्या जिद्दीचा प्रवास
दहावीत असतानाच वडिलांचे छत्र गमावलेले.. शेती कोरडवाहू.. दर महिन्याच्या शेवटी आर्थिक तंगीची स्थिती.. लष्करी सेवेच्या माध्यमातून नौकानयन या सर्वस्वी अनोख्या खेळाची झालेली ओळख. या खेळात प्रावीण्य मिळवताना आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवलेली छाप.. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी कोरियाला रवाना होताना आईच्या आजारपणामुळे मनाची घालमेल. परिस्थितीने उभ्या केलेल्या या सर्व अडथळ्यांशी लढत नाशिकच्या दत्तू भोकनळने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोटय़ाशा गावात दत्तूचे बालपण गेले. दहावीच्या उंबरठय़ावर असताना वडिलांचे निधन झाले. लहान वयात कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूने मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर लष्करी सेवेत स्थान मिळवले. लष्करी दिनक्रमाचा भाग म्हणून तो बास्केटबॉल खेळत असे. मात्र दत्तूची उंची आणि धडधाकट शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. ऑलिम्पिक स्पर्धेचा भाग असलेल्या नौकानयन या खेळाबद्दल दत्तूला काहीही माहिती नव्हती. मात्र लष्करामधील शिस्तबद्ध यंत्रणेमुळे तो या खेळात रुळला. तांत्रिक गोष्टी शिकतानाच २०१४मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. गेल्या वर्षी चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले होते. पुण्यातल्या खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमधून कारकीर्दीची सुरुवात करणारा दत्तू आता पुण्यातच एआरएन विभागात कार्यरत आहे.
‘‘दुचाकीवरून पडल्यामुळे दत्तूच्या आईच्या डोक्याला मार लागला आहे. नाशिकमधल्या सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर आता त्यांना पुण्याच्या लष्कराच्या कमांड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुखापतीमुळे त्यांना माणसे ओळखण्यात अडचणी येत आहेत. ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न उराशी असताना आईच्या आजारपणामुळे १७ तारखेला कोरियाला रवाना होताना दत्तू भावूक झाला होता. मात्र प्रशिक्षक इस्माइल बेग आणि संघातील सहकाऱ्यांच्या पुढाकारामुळे दत्तू कोरियाला रवाना झाला आणि काही दिवसांतच ऑलिम्पिक पात्रतेचे स्वप्न साकार केले,’’ असे दत्तूचा भाऊ रवींद्र भोकनळने सांगितले. आशिया आणि ओश्ॉनिया खंडनिहाय ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेत सिंगल स्कल प्रकारात दत्तूने ७ मिनिटे आणि ७.६३ सेकंदात दोन किलोमीटरची शर्यत दुसऱ्या स्थानासह पूर्ण केली. अव्वल सात नौकानयनपटूंची रिओवारी पक्की झाली. अव्वल स्थानासह सुवर्णपदक मिळवण्यासाठी दत्तू आघाडीवर होता. १५०० मीटरच्या टप्प्यापर्यंत तो सगळ्यात पुढे होता. मात्र कोरियाच्या डोंगयांग किमने अव्वल स्थानासह सुवर्णपदकावर कब्जा केला.

दत्तू पात्र ठरल्याने नौकानयन क्षेत्रासाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. २०००पासून या खेळात ऑलिम्पिकमध्ये भारतीय चांगली कामगिरी करत आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने दत्तूला ऑलिम्पिक लक्ष्य योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य मिळेल. सरावासाठी दत्तूला विदेशी पाठवण्यासंदर्भात निर्णय दत्तू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक इस्माइल बेग यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल.
-गिरीश फडणीस, भारतीय नौकानयन महासंघाचे सरचिटणीस

नौकानयन या खेळाची मला जराही कल्पना नव्हती. लष्करी सेवेमुळेच खेळातले तांत्रिक दुवे समजून घेत वाटचाल करता आली. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने प्रचंड आनंद झाला आहे. सुवर्णपदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये प्रयत्न कमी पडले.
-दत्तू भोकनळ