News Flash

बंगळुरूत धावांचे वादळ

शतकी खेळींदरम्यान या जोडीने असंख्य विक्रमांना गवसणी घातली.

विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांची शतकी खेळी

गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजय

स्वप्नवत सूर गवसलेला विराट कोहली आणि अद्भुत फटकेबाजीचा अवलिया एबी डी’व्हिलियर्स यांनी बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर चाहत्यांच्या प्रचंड पाठिंब्यासमोर शस्त्ररूपी बॅट परजल्या आणि धावांचे वादळ घोंगावले. दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने २० षटकांत २४८ धावांचा डोंगर उभारला. शतकी खेळींदरम्यान या जोडीने असंख्य विक्रमांना गवसणी घातली. बंगळुरूने भेदक मारा करताना गुजरातला १०४ धावांत गुंडाळत त्यांचा पालापाचोळा केला. बाद फेरी गाठण्यासाठी बंगळुरूला चारपैकी चारही लढतीत विजय अनिवार्य आहे. या लढतीत दणदणीत विजयासह बंगळुरूने गुणतालिकेतील स्थान आणि धावगती सुधारली आहे.

गुजरात लायन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. धवल कुलकर्णीने धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला बाद करत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. कोहली आणि डी’व्हिलियर्स जोडीने सावध सुरुवात केली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर डी’व्हिलियर्सने चौकार, षटकारांची पोतडी उघडली. डी’व्हिलियर्स आक्रमक होत असताना कोहलीने दुसऱ्या बाजूने एकेरी, दुहेरी धावांवर भर देत संयमी खेळ केला. १०व्या षटकात बंगळुरूची स्थिती १ बाद ७६ अशी होती. यानंतर या जोडीने पवित्रा बदलला. धवलच्या तिसऱ्या षटकात या जोडीने २२ धावा चोपून काढल्या. प्रवीण तांबेच्या दुसऱ्या षटकात त्यांनी १४ धावांची लूट केली. घोटीव यॉर्कर आणि फसवे स्लोअरवनसाठी प्रसिद्ध प्रवीण कुमारच्या तिसऱ्या षटकांत या जोडीने तीन षटकार, एक चौकारासह २३ धावांची खैरात केली. याच षटकात एकेरी धाव घेत डी’व्हिलियर्सने शतक पूर्ण केले. डी’व्हिलियर्सच्या शतकाच्या वेळी कोहली ५१ धावांवर खेळत होता. डी’व्हिलियर्सच्या शतकातून प्रेरणा घेत कोहलीने चौकार, षटकारांची टांकसाळच उघडली. नवोदित फिरकीपटू शिविल कौशिकच्या एका षटकात कोहलीने ३० धावा फटकावल्या. डावाच्या शेवटच्या षटकात कोहलीने प्रवीण कुमारच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत यंदाच्या हंगामातील तिसऱ्या शतकाची नोंद केली. शतकानंतर आणखी एक षटकार लगावून कोहली बाद झाला. त्याने ५ चौकार आणि ८ षटकारांसह ५५ चेंडूत १०९ धावांची वेगवान खेळी साकारली. डी’व्हिलियर्सने नाबाद राहताना ५२ चेंडूत १० चौकार आणि १२ षटकारांसह १२९ धावांची मेजवानी चाहत्यांना सादर केली. या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना ड्वेन स्मिथ ७ धावा करून परतला. ब्रेंडन मॅक्क्युलमला युझवेंद्र चहलने डी’व्हिलियर्सकडे झेल देण्यास भाग पाडले. डी’व्हिलियर्सच्या सुरेख झेलच्या बळावर दिनेश कार्तिकची खेळी संपुष्टात आली. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला रवींद्र जडेजा विशेष कमाल दाखवू शकला नाही. ख्रिस जॉर्डनने त्याला त्रिफळाचीत केले. चहलने ड्वेन ब्राव्होला झटपट पायचीत करत गुजरातची अवस्था ५ बाद ४७ अशी केली. यानंतर अनुभवी आरोन फिंचने चिवटपणे खेळ करत ३७ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स गमावल्याने गुजरातचा डाव १०४ धावांतच गडगडला. बंगळुरूतर्फे ख्रिस जॉर्डनने ४, तर युझवेंद्र चहलने ३ गडी बाद केले.

२ एबी डी’व्हिलियर्स (१२९) आणि विराट कोहली (१०९) यांनी एकाच डावात शतके झळकावली. ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये एकाच डावात दोन फलंदाजांनी शतके झळकावण्याची दुसरीच वेळ. याआधी केव्हिन ओब्रायन आणि हॅमिश मार्शल यांनी ग्लुस्टरशायरचे प्रतिनिधित्व करताना मिडलसेक्सविरुद्ध २०११ मध्ये एकाच डावात शतके झळकावली होती.

२२९ डी’व्हिलियर्स आणि कोहली जोडीने दुसऱ्या विकेटसाठी केलेली भागीदारी. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासातली धावांची सर्वोच्च भागीदारी. योगायोगाने या जोडीने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे मैदानावर खेळताना केलेला २१५ धावांचा स्वत:चाच विक्रम मोडला. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात दोन द्विशतकी भागीदाऱ्या नावावर असणारी एकमेव जोडी.

३ इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातील विराट कोहलीच्या शतकांची संख्या. एका विशिष्ट ट्वेन्टी-२० स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावण्याचा मायकेल क्लिंगरच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी. क्लिंगरने नॅटवेस्ट ट्वेन्टी-२० ब्लास्ट २०१५ स्पर्धेत तीन शतके झळकावली होती.

११२ बंगळुरू संघाने शेवटच्या पाच षटकांत फटकावलेल्या धावांची संख्या. ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या शेवटच्या पाच षटकांत झालेल्या सर्वाधिक धावा. कोणत्याही संघाने शेवटच्या पाच षटकांत शंभरपेक्षा धावा केल्या नव्हत्या. याआधीचा ८८ धावांचा विक्रमही याच जोडीच्या नावावर होता.

२ दोन षटकांत प्रत्येकी ३० धावांची लूट करण्यात आली. ड्वेन ब्राव्होने टाकलेल्या १८व्या तर शिविल कौशिकने टाकलेल्या १९व्या षटकांत मिळून बंगळुरूने ६० धावा चोपून काढल्या. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत एका डावात दोनदा एवढय़ा धावा होण्याची पहिलीच वेळ.

२ इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत दुसरी सर्वोच्च धावसंख्या. सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही बंगळुरू संघाच्या नावावर. ख्रिस गेलच्या १७५ धावांच्या जोरावर बंगळुरूने २०१३ मध्ये २६३/५ धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ३ बाद २४८ (एबी डी’व्हिलियर्स १२९, विराट कोहली १०९; प्रवीण कुमार २/४५) विजयी विरुद्ध गुजरात लायन्स : १८.४ षटकांत सर्वबाद १०४ (आरोन फिंच ३७; ख्रिस जॉर्डन ४/११, युझवेंद्र चहल ३/१९)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 2:34 am

Web Title: royal challengers bangalore beat gujarat lions
Next Stories
1 प्लेऑफ लढतीसाठी दिल्लीपुढे मुंबई इंडियन्सचे आव्हान
2 किंग्ज इलेव्हनपुढे आज सनरायझर्सची कसोटी
3 ऑलिम्पिकवारी हा माझाच हक्क – नरसिंग यादव
Just Now!
X