बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलच्या सातव्या पर्वात पहिल्या चार जणांमध्ये स्थान मिळविण्यासाठी रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी बंगळुरू संघासाठी ही लढत महत्त्वाची आहे.
चेन्नईने २०१० व २०११मध्ये या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. या वेळी त्यांनी दहा सामन्यांमध्ये आठ सामने जिंकून १६ गुणांची कमाई केली आहे. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. नुकत्याच झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यांच्या फलंदाजीची मदार कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ड्वेन स्मिथ, ब्रॅन्डन मॅक्क्युलम, फॅफ डय़ू प्लेसिस यांच्यावर आहे. गोलंदाजीत रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहित शर्मा यांच्याकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मोहितने आतापर्यंत या स्पर्धेत १८ गडी बाद केले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आतापर्यंत १० सामन्यांमध्ये केवळ चारच सामने जिंकता आले आहेत. त्यांच्या फलंदाजीची मुख्य मदार युवराज सिंग, ख्रिस गेल, एबी. डी’व्हिलियर्स, विराट कोहली यांच्यावर आहे. कोहली व डी’व्हिलियर्स यांनी यंदा अपेक्षेइतकी चमक दाखविलेली नाही. गोलंदाजीत मिचेल स्टार्क, मुथय्या मुरलीधरन यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.