आयपीएलविश्वातील ‘डॉन’ ख्रिस गेलचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या लढतीची क्रिकेटविश्वात फारशी उत्सुकता उरलेली नाही. बंगळुरूच्या संघाची बादफेरीच्या दिशेने घोडदौड सुरू असताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आयपीएलच्या सहाव्या पर्वातील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे जिंकून प्रतिष्ठा टिकवावी, हाच दिल्लीचा आशावाद आहे.
गतवर्षीची दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी आणि यंदाची यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक जाणवत आहे. गेल्या वर्षी साखळीमध्ये दिल्लीच्या खात्यावर सर्वाधिक गुण जमा होते. तथापि, या वर्षी आतापर्यंतच्या १२ सामन्यांत त्यांच्या वाटय़ाला आले आहेत नऊ पराभव. सद्यस्थितीत ते कोणत्याही दडपणाखाली खेळू शकतात. सामन्याच्या जय-पराजयाने त्यांना कोणताही परक पडणार नाही.
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आघाडीच्या फळीचे अपयश त्यांना चांगलेच भोवले. धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग असो, वा कप्तान महेला जयवर्धने, आपल्या दर्जाला साजेसा या सलामीवीरांचा खेळ बहरलाच नाही. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याचीच फलंदाजी फक्त अपेक्षेप्रमाणे झाली.
दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ डेव्हिड मिलरच्या धक्क्यातून अद्याप सावरलेला नाही. बादफेरीचे स्वप्न आता साद घालत असताना बंगळुरूला कोणताही धोका पत्करता येणार नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे ‘प्ले-ऑफ’मधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. परंतु उर्वरित तीन स्थानांसाठी मुंबई इंडियन्स, बंगळुरू, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात तीव्र चुरस आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मार्ग अधिक सुकर आहे. त्यांच्या उर्वरित चार सामन्यांपैकी तीन लढती दिल्ली, कोलकाता नाइट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या स्पध्रेतून गाशा गुंडाळलेल्या संघांशी आहेत. पण बादफेरीची पायरी चढण्यापूर्वी साखळीतील त्यांची अखेरची लढत १८ मे रोजी बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.
बंगळुरू संघाला फलंदाजीची चिंताच नाही. प्रथम फलंदाजी करीत त्यांनी सातत्याने दोनशेहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय धावसंख्येची अनेक आव्हाने त्यांनी लीलया पेलली आहेत. कारण गेलसारखा स्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहे. परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या मागील सामन्यात मिलरने बंगळुरूच्या गोलंदाजांवर कडाडून हल्ला केला. मागील चार सामन्यांचा आढावा घेतल्यास पंजाब, राजस्थान, पुणे वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी बंगळुरूविरुद्ध १७०हून अधिक धावा केल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रवी रामपॉलने अखेरच्या षटकांतसुद्धाा टिच्चून गोलंदाजी केली. परंतु आर. पी. सिंग आणि आर. विनय कुमार हे पंजाबविरुद्ध महागात पडले होते. सुदैवाने शुक्रवारी बंगळुरूच्या गोलंदाजांचा मुकाबला आहे तो धावांसाठी झगडणाऱ्या संघाशी. त्यामुळे दिल्लीच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पारडे निश्चितपणे जड आहे.
सामना : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स.
स्थळ : फिरोझशाह कोटला स्टेडियम, दिल्ली.
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.