मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसंघाला उशिरा सूर गवसला असला तरी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांची चेन्नई सुपर किंग्ज संघापुढे शनिवारी गहुंजे स्टेडियमवर कसोटीच ठरणार आहे.

चेन्नई संघ साखळी गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांना येथील मैदानावर मुंबई इंडियन्सपुढे सपशेल शरणागती पत्करावी लागली होती. त्यातच गुरुवारी त्यांना कोलकाता नाईट रायडर्सनेही पराभवाचा धक्का दिला आहे. त्यामुळेच महेंद्रसिंग धोनीसारख्या कुशल नेतृत्वाखाली उतरलेल्या चेन्नई संघाला विजयपथावर पुन्हा येण्यासाठी सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. बेंगळुरू संघाविरुद्ध विजय मिळविणे सोपे नाही, हे लक्षात घेऊनच त्यांना उतरावे लागणार आहे. या मोसमात सातत्याने चमक दाखवणारे अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो व सुरेश रैना यांच्याप्रमाणेच स्वत: धोनी याच्यावरही चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त आहे. दीपक चहार या गोलंदाजाच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूर, वॉटसन, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, रवींद्र जडेजा यांच्याकडून गोलंदाजीत प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे. हे गोलंदाज विराट कोहलीला कितपत रोखतात, हीच उत्सुकता आहे.

कोहली हा बंगळुरू संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याने आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ४४९ धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाज एबी डी’व्हिलीयर्स तापामधून बरा झाला असल्यामुळे बेंगळुरूची बाजू वरचढ झाली आहे. बेंगळुरू संघास क्विंटन डी कॉक, ब्रँडन मॅक्क्युलम, मनदीप सिंग, कॉलिन डी ग्रँडहोम यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. उमेश यादव व युजवेंद्र चहाल हे त्यांच्या गोलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्याबरोबरच महम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा आहेत. कोरी अँडरसनऐवजी अनुभवी गोलंदाज टीम साउदीला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सहसा येथील खेळपट्टी फलंदाजीस पोषक असते. त्यामुळेच चाहत्यांना सुट्टीच्या दिवशी चौकार व षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

 

दिल्ली जिंकण्याचे हैदराबादचे मनसुबे

दिल्ली डेअरडेव्हिल्सचे युवा फलंदाज त्यांच्या संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील असले तरी शनिवारी त्यांचा सामना वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या बळावर आगेकूच करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाशी आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला हैदराबादचा संघ त्यांचे अग्रस्थान कायम राखण्यासाठी दिल्लीवर विजय मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची वाटचाल पहिल्या मोसमापासून यंदापर्यंत अडखळतच सुरू आहे. यंदाच्या मोसमात दिल्लीने नऊ सामन्यांपैकी केवळ ३ सामनेच जिंकण्यात यश मिळवले आहे. दिल्लीचे केवळ पाच सामनेच शिल्लक असल्याने बाद फेरीत पोहोचायचे असल्यास एक पराभवदेखील त्यांना परवडणारा नाही.

पाच पराभवांच्या मालिकेनंतर गौतम गंभीर कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ अधिक गुणवान भासू लागला आहे. मागील सामन्यात दिल्लीने राजस्थानला पराभूत करीत संघासाठी मोलाचे दोन गुण जमा केले आहेत. सलामीवीर पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर हे संघाच्या फलंदाजीत महत्त्वाचे योगदान देत आहेत. कॉलिन मन्रो आणि ग्लेन मॅक्सवेल हे अद्याप तितकीशी चमक दाखवू शकले नसले तरी जेव्हा ते खेळतील तेव्हा ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. पण आता त्यांना चमक दाखवायला केवळ पाचच सामने शिल्लक असल्याने या सामन्यापासूनच त्यांनी लयीत परतणे अत्यावश्यक आहे. गोलंदाजांमध्ये ट्रेंट बोल्ट चांगली कामगिरी करीत असून त्याने आतापर्यंत १३ बळी मिळवले आहेत. आवेश खान, लियाम प्लंकेट आणि शाहबाज नदीम यांना अजून चमक दाखवावी लागणार आहे.

दुसरीकडे ८ सामन्यांमधून १२ गुण मिळवत हैदराबादचा संघ गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी आहे. कमी धावसंख्या उभारल्यानंतरही अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यांचे सिद्धार्थ कौल, राशीद खान, संदीप शर्मा आणि बसील थम्पी हे गोलंदाज आणि अष्टपैलू शकिब अल हसन, मोहम्मद नबी, युसूफ पठाण हे पूर्ण बहरात आहेत. मागील सामन्यात अवघ्या १३२ धावा करूनदेखील त्यांनी पंजाब संघाला ११९ धावांमध्येच गुंडाळत विजय संपादन केला. राजस्थानपुढे १५२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर त्यांना १४० मध्येच रोखले. तर फलंदाजीमध्ये कर्णधार केन विल्यम्सन, मनीष पांडे, वृद्धीमान साहा, दीपक हुडा आणि पठाण त्यांचे योगदान देत आहेत. संघ प्रशिक्षक टॉम मुडी यांनी संघाच्या वाटचालीवर समाधान व्यक्त करतानाच अशीच कामगिरी पुढेही सुरू राखण्यासाठी मेहनत घेत असल्याचे सांगितले.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स