कोलकाताविरुद्धच्या लढतीत कोहलीला गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत २०६ धावांचा बचाव करण्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाला अपयश आले होते. याच पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये (आयपीएल) रविवारी घरच्या प्रेक्षकांसमोर कोलकाता नाइट रायडर्सशी दोन हात करण्यासाठी बेंगळूरु उतरणार आहे.

या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोलकाताविरुद्धच झालेल्या पराभवाची परतफेड करण्याचे मनसुबे बेंगळूरुचे असतील. मात्र, गोलंदाज कशी कामगिरी करतात यावरच बेंगळूरुचे भवितव्य अवलंबून आहे.

सहा सामन्यातून दोन विजयांसह बेंगळूरु सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. येथुन पुढे स्पर्धा आणखी चुरशीची होणार असल्यामुळे बेंगळूरुला आतापासूनच सावध व्हावे लागेल. त्यांचा एबी डी’व्हिलियर्स तुफान फॉर्मात असून त्याला कर्णधार कोहली, क्विंटन डी कॉक योग्य ती साथ देखील देत आहेत. मात्र, बेंगळूरुला मुख्य चिंता सतावते आहे ती म्हणजे गोलंदाजीची. उमेश यादव, कोरे अँडरसन, मोहम्मद सिराज यांना चेन्नईच्या फलंदाजांनी चांगलेच झोडपले होते. त्यामुळे युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना आपल्या फिरकीच्या बळावर बेंगळूरुला विजयी करावे लागेल.

दुसरीकडे कर्णधार दिनेश कार्तिकचा कोलकाता संघ सध्या मिश्र स्वरूपाची कामगिरी करत असून सात सामन्यातील तीन विजयांसह ते चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्लाविरुद्धच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी २१९ धावा लुटल्या. शिवम मावी, आंद्रे रसेल, मिचेल जॉन्सन यांना कामगिरीत सातत्य दाखवण्याची गरज आहे. बेंगळूरुप्रमाणेच कोलकात्याची भिस्त पीयूष चावला, कुलदीप यादव आणि सुनील नरिन या फिरकीवीरांवर आहे. फलंदाजीत कोलकात्याकडे रसेलसह ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, शुभमन गिल अशी धडाकेबाज फलंदाजांची फौज उपलब्ध आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.

 

हैदराबादचा आज राजस्थानशी सामना

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेला राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा रविवारी सामना करणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला पराभूत करून आगेकूच सुरू ठेवलेला हैदराबादचा संघ अत्यंत चांगल्या लयीत आहे. त्यामुळे जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हैदराबाद संघाने त्यांच्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यात तर, राजस्थानने सहापैकी तीन सामन्यांत विजय मिळवलेला आहे.

मुंबईविरुद्ध अष्टपैलू कृष्णप्पा गौथमने केलेल्या खेळीमुळे राजस्थानने अनपेक्षित विजय मिळवला.  कर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या खेळीतून संघासमोर आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. संजू सॅमसनचा फलंदाजीतील धडाका कायम असल्याने तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. तर इंग्लंडचे जोस बटलर व बेन स्टोक्स हे खेळाडूदेखील फलंदाजीत भरीव योगदान देत आहेत. गोलंदाजीत धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि कृष्णप्पा गौथम यांच्यावर जबाबदारी आहे.

दुसरीकडे वॉर्नरच्या अनुपस्थितीत खेळत असूनही हैदराबाद संघाची वाटचाल अत्यंत प्रभावी आहे.  शिखर धवन या सामन्यात चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. तर कर्णधार केन विल्यम्सन या सामन्यात आपले योगदान देण्यासाठी सज्ज आहे. दीपक हुडा आणि युसूफ पठाणमुळे त्यांची फलंदाजी खोलवर पसरलेली आहे, तर गोलंदाजीत अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशीद खान व भुवनेश्वर कुमारवर हैदराबादच्या यशाची मदार राहणार आहे. त्याशिवाय शाकीब अल हसन, बसिल थम्पी आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळेच हैदराबादने कमी धावांचा तीन वेळा  बचाव केला आहे.  वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हैदराबादचा संघ या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनासुद्धा जाळ्यात अडकवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.