उभय देशांमधील क्रिकेट मालिका आयोजित न करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात (बीसीसीआय) कायदेशीर लढाई लढणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) विवाद निराकरण समितीने दणका दिला आहे. आता नुकसान भरपाई म्हणून जवळपास ११ कोटी रुपये पीसीबीने बीसीसीआयकडे सुपूर्द केली आहे, असा दावा पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी केला आहे.

गेल्या वर्षी बीसीसीआयविरोधात पीसीबीने आयसीसीच्या क्रीडा लवादाकडे खटला दाखल केला होता. त्यात त्यांनी ४८० कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी बीसीसीआयकडून केली होती. क्रीडा लवादाने ही मागणी फेटाळून लावली असून उलट हा खटला चालवल्याप्रकरणी बीसीसीआयला ११ कोटी रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश लवादाने दिले होते.

‘‘आयसीसीच्या समितीने आमची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई म्हणून ११ कोटी रुपये भारतीय मंडळाला द्यावे लागले. कायदेशीर आणि प्रवास खर्च म्हणून ही भरपाई द्यावी लागली आहे,’’ असे मणी यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१५ ते २०२३ दरम्यान सहा मालिका आयोजित करण्यात येतील, असा करार करण्यात आला होता. मात्र बीसीसीआयने हे आश्वासन पाळले नाही, असा आरोप पाकिस्तान मंडळाने केला आहे. बीसीसीआयने या सामंजस्य करारानुसार पीसीबीशी बोलणी कायम ठेवली असून कराराचे उल्लंघन केलेले नाही. बीसीसीआयचे हेच म्हणणे क्रीडा लवादाने मान्य केले आणि पीसीबीची याचिका फेटाळून लावली. त्याबरोबरच आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतदेखील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.