27 February 2021

News Flash

२ कोटींचे मानधन खूपच कमी, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जास्त मिळतात: रवी शास्त्री

कोहलीपाठोपाठ रवी शास्त्रींचा नाराजीचा सूर

माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री

मानधनात घसघशीत वाढ होऊनही भारतीय क्रिकेटपटूंकडून करण्यात येत असलेल्या अधिक मानधनाच्या मागणीचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी समर्थन केले आहे. बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंना देण्यात आलेली मानधन वाढ तुटपुंजी असल्याचे शास्त्री यांनी म्हटले आहे. मागील महिन्यात बीसीसीआयकडून अ, ब आणि क गटातील खेळाडूंचे मानधान दुप्पट केले होते. यानुसार अ गटातील खेळाडूंना २ कोटी, ब गटातील खेळाडूंना १ कोटी, तर क गटातील खेळाडूंना ५० लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच बीसीसीआयने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचे मानधन अनुक्रमे १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख रुपये करण्यात आले आहे.

भारतीय खेळाडूंच्या मानधनात यंदा दुपटीने वाढ करण्यात आली आहे. मात्र रवी शास्त्री यांनी या मानधन वाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘भारतीय खेळाडूंना मिळत असलेले मानधन काहीच नाही. दोन कोटी रुपये अतिशय कमी आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना किती पैसे मिळत आहेत,’ अशा शब्दांमध्ये रवी शास्त्री यांनी मानधन वाढीबद्दल नाराजी व्यक्त केली.

बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनावर बोलताना रवी शास्त्री यांनी चेतेश्वर पुजाराचे उदाहरण दिले. ‘पुजारासाठी आयपीएलमधील कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही. सौराष्ट्रचा हा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. याबद्दल पुजाराच्या मनात काही चिंता आहे का, हे बीसीसीआयने जाणून घ्यायला हवे,’ असे रवी शास्त्री यांनी म्हटले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल (सोमवारी) खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. अ गटातील खेळाडूंना २ कोटींऐवजी किमान ५ कोटी दिले जावेत, असे कोहलीने म्हटले होते. याशिवाय, खेळाडूंनीही बीसीसीआयकडून अजूनही आपल्याला अपेक्षित मानधन मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्याचे वृत्त क्रिकइन्फोने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खुद्द विराट कोहलीनेच ‘अ’ गटातील खेळाडूंचे मानधन किमान ५ कोटी इतके असावे, अशी मागणी करून खेळाडूंमधील नाराजीच्या भावनेला वाचा फोडली.

भारतीय संघाच्या कर्णधाराच्या या मागणीने बीसीसीआयला आश्चर्याचा धक्का बसला असून या प्रश्नावर येत्या ५ एप्रिलला बैठक होणार आहे. बीसीसीआयच्या प्रशासक समितीने येत्या ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून खेळाडूंना आयपीएलचे पर्व संपेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा खेळाडू जो रुट यांनाही त्यांच्या संबंधित क्रिकेट बोर्डाकडून आपल्या तुलनेत जास्त मानधन दिले जात असल्याचाही मुद्दा बीसीसीआयसमोर उपस्थित केला. अनिल कुंबळे यांनीही कोहलीच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 2:00 pm

Web Title: rs 2 crore is peanuts ravi shastri backs team indias reported demand for pay hike
Next Stories
1 IPL 2017: कोहलीच्या अनुपस्थितीत शेन वॉटसनकडे बंगळुरुची धुरा
2 फेडररची स्वप्नवत वाटचाल
3 चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द व्हावी-शास्त्री
Just Now!
X