न थांबता धावण्याच्या आपल्या क्षमतेने अनेकांना आश्चर्यचकीत करणारा बुधिया सिंग तर तुमच्या लक्षात असेलचं. जर विसरला असाल, तर आठवण करून द्यायला आम्ही मदत करतो. बुधिया २००६ मध्ये प्रकाशझोतात आला. ६५ किलोमीटरचे अंतर (पूरी ते भुवनेश्वर) त्याने सात तास दोन मिनिटांत धावून पूर्ण केले होते. त्यावेळी तो चार वर्षांचा होता. परंतु परिस्थिती आणि बुधिया दोघांमध्ये बदल झाला आहे. आता छोटेसे अंतरदेखील तो योग्यप्रकारे धावू शकत नाही. सध्या तो भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियम हॉस्टेलवर राहून तेथेच ट्रेनिंग घेतो. मी ४०० मीटर शर्यतीतदेखल सर्वात शेवटी येतो. मला ट्रेनिंग द्यायला कोणी नसल्याचा हा परिणाम आहे, असे बुधियाचे म्हणणे आहे.
कमी अंतर धावणाऱ्यांवर स्टेडियमचे लक्ष केंद्रित –
ज्या स्टेडियममध्ये त्याला ठेवण्यात आले आहे, तेथे कमी अंतर धावणाऱ्यांवर सर्व लक्ष केंद्रित असल्याची बुधियाची तक्रार आहे. बुधियाला सुरुवातीला प्रशिक्षण देणारे कोच विरंची दास यांची हत्या करण्यात आली. जेव्हा आपल्याला येथे आणण्यात आले, तेव्हा आठवड्याच्या शेवटी घरच्यांना भेटण्यासाठी घरी जाता येईल असे सांगण्यात आले होते. परंतु, नंतर सर्व गोष्टींसाठी नकार देण्यात आला. माझी आई आणि बहिणी कधी-कधी मला भेटायला येतात, असे बुधिया पुढे म्हणाला.
चित्रपटाच्या प्रतिक्षेत –
आपल्या जीवनावर साकारत असलेल्या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आपण असल्याचे बुधियाने सांगितले. ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामुळे लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधले जाईल, अशी त्याला अपेक्षा आहे. माझा चित्रपट लोक पाहतील, अशी मला आशा आहे आणि परत शर्यतीतील वेग पकडण्यासाठी मला ते मदत करतील, असे बुधिया म्हणाला.
निर्मात्याने दिले पैसे –
चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्याला २.७ लाख रुपये दिल्याची माहिती बुधियाच्या आईने दिली. हा पैसा ती मुलाच्या कारकिर्दीसाठी लावू इच्छिते. परंतु, त्याच्या बहिणीचे यावर्षी लग्न होणार असून, मिळालेल्या पैशातून काही रक्कम तिच्या लग्नासाठी खर्च करण्यात येईल आणि बाकीची रक्कम बुधियासाठी ठेवण्यात येणार आहे.