प्रो कबड्डी लीग गेली तीन वष्रे क्रीडारसिकांच्या मनांवर आधिराज्य गाजवत आहे. या संदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार १८ कोटी ९० लाख देशवासी प्रो कबड्डीचा टेलिव्हिजनवर आस्वाद घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. तिसऱ्या हंगामातील ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी या १४ दिवसांच्या पाहणीनुसार नऊ कोटी शहरी आणि नऊ कोटी ९० लाख ग्रामीण भागातील प्रेक्षकसंख्या नोंदवण्यात आली आहे. याचाच अर्थ प्रो कबड्डी पाहणाऱ्यांच्या आकडेवारीत ग्रामीण भागाने शहरी भागाला मागे टाकले आहे.

प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील प्रेक्षकसंख्या पहिल्या हंगामापेक्षा २० टक्क्यांनी वधारली होती. त्यानंतर प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामातील पहिल्या आठवडय़ाच्या प्रेक्षकसंख्येने मागील हंगामापेक्षा ३६ टक्क्यांनी उंची गाठली आहे. हंगामागणीक प्रेक्षकसंख्येत वाढ होत असल्याचे सिद्ध होत आहे.

‘‘देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागात कोणताही खेळ इतका लोकप्रिय झाला नव्हता. पुरुष, स्त्रिया आणि मुले या सर्वामध्ये या खेळाची मोठी उत्सुकता असल्यामुळे क्रिकेटनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आवडता खेळ अशी ओळख कबड्डीला मिळू लागली आहे,’’ असे मत ‘स्टार इंडिया’चे  मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर यांनी व्यक्त केले.