मॉस्को : उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागासाठी घालण्यात आलेल्या बंदीला शुक्रवारी रशियन उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (रुसाडा) आव्हान दिले आहे.

‘‘आम्ही जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेला (वाडा) दस्ताऐवज पाठवण्याची प्रक्रिया केली आहे. यात ‘वाडा’ची नोटीस फेटाळण्याचे नमूद करण्यात आले आहे,’’ असे ‘रुसाडा’चे महासंचालक युरी गानूस यांनी म्हटले आहे.

उत्तेजकांच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ‘वाडा’ने डिसेंबर महिन्यात उत्तेजक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रशियावर चार वर्षांची बंदी घातली. त्यामुळे २०२०ची टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि २०२२च्या कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही. ही बंदी राजकीय दृष्टय़ा प्रेरित असून, त्याला कायदेशीर आव्हान दिले जाणार आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे.