हिवाळी ऑलिम्पिक : फिगर स्केटिंगमध्ये अ‍ॅलिना झॅगिटोवा हिला सुवर्ण;

रशियाच्या अ‍ॅलिना झॅगिटोवा व एवगेनिया मेदवेदेव यांनी फिगर स्केटिंगमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळवत हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र त्यांची सहकारी नादेझेदा सर्जीयेवा ही उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यांचे यश झाकोळले गेले.

सर्जीयेवाची दोन वेळा उत्तेजक चाचणी घेण्यात आली. दोन्ही वेळा ती दोषी आढळल्याचे स्पर्धा संयोजन समितीकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रशियन संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञानेही त्यास दुजोरा दिला. त्यामुळे तिची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सोची येथे गतवेळी झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या पदक विजेत्या खेळाडूंपैकी अनेक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले होते. त्यामुळे यंदा त्यांच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली सहभागी व्हावे लागले आहे. या पाश्र्वभूमीवर अ‍ॅलिना व एवगेनिया यांनी खरोखरीच दिमाखदार कौशल्य दाखविले. अ‍ॅलिना ही अवघी पंधरा वर्षीय खेळाडू आहे. कॅनडाच्या कॅटलिन ओस्मांडा हिला कांस्यपदक मिळाले. तिच्या सहकारी कॅल्सी सेरवा व ब्रिटनी फिलान यांनी स्कीईंग क्रॉसकंट्रीमध्ये अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

पुरुषांच्या एक किलोमीटर स्पीड स्केटिंगमध्ये नेदरलँड्सच्या केजिल्ड नुईस याने सोनेरी कामगिरी केली तर हेवर्ड लोरेन्टेझेन (नॉर्वे) व किम नेई युआन (दक्षिण कोरिया) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. याच विभागातील चार बाय साडेसात किलोमीटर  अंतराच्या बायथलॉन रिले शर्यतीत स्वीडन संघाने सोनेरी यश संपादन केले. नॉर्वे व जर्मनी हे अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले.